Join us

ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 6:35 AM

३ व ८ ऑक्टोबरला घरांची लॉटरी

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे ८ हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल. ३ ऑक्टोबरला ठाण्यातील २० टक्के योजनेतील ९१३ घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात येईल. ८ ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील ७ हजार घरांची लॉटरी काढली जाईल. यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला प्राप्त ९१३ घरांचा समावेश आहे. यात ठाणे, टिटवाळा, वसई परिसरातील घरे असतील. घरांच्या किमती २० लाखांच्या जवळपास असतील.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता दुसरीकडे म्हाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीचीही तयारी सुरू केली आहे. 

विरार गृहसंकुलांतील तक्रारींचे निवारण

विरार-बोळिंज येथील म्हाडाच्या इमारतींना पाण्याचा प्रश्न, अपुरे रस्ते अशा अनेक समस्या भेडसावत होत्या. यासंदर्भात विरार येथील लॉटरी विजेत्यांनी म्हाडाकडे तक्रारीही केल्या होत्या. या सुविधा मिळाव्यात, म्हणून म्हाडाकडून कालांतराने प्रयत्न करण्यात आले. तरीही कोकण मंडळाच्या लॉटरीमधील घरे परत करणाऱ्या अर्जदारांचे प्रमाण लक्षणीय होते. त्याला अनुलक्षून म्हाडाने या गृहसंकुलांमधील त्रुटी दूर करत उपाययोजना सुरू केली होती. 

बिल्डरांकडील घरांचाही समावेश

मागील लॉटरीनंतरही रिक्त राहिलेली घरे नव्याने लॉटरीत समाविष्ट करण्याचे काम म्हाडाने यापूर्वीच सुरू केले होते. त्यानुसार, कोकण मंडळातील आतापर्यंत रिक्त राहिलेली घरे आणि खासगी बिल्डरांकडून मिळालेली घरे अशी एकत्रितपणे घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे. 

टॅग्स :मुंबईम्हाडावसई विरार