२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी

By संतोष आंधळे | Published: June 1, 2024 05:52 AM2024-06-01T05:52:40+5:302024-06-01T05:53:48+5:30

जे. जे.ला ५ लाख, कूपरला ४ लाख आणि नायरला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे

20 medical colleges fined by commission 2 months period for rectifying errors | २० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी

२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्राध्यापकांची अपुरी संख्या, ऑपरेशन्सची कमी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव अशा विविध कारणांमुळे  राज्यातील शासनाच्या १८ आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील नायर आणि कूपर या दोन वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रत्येकी ३ ते ६ लाख रुपयांचा दंड ठोठावत दोन महिन्यांत त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. हा दंड का लावला आहे, याबाबत मात्र अधिष्ठात्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मार्च महिन्यापूर्वी राज्यातील सर्व जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांकडून विहीत नमुन्यात माहिती मागविली होती.  आयोगाकडे असणाऱ्या उपलब्ध माहितीच्या आधारे आयोगाने काही गोष्टींची महाविद्यालयात कमतरता असल्याचे आढळून आल्याचे सांगून दंड ठोठावल्याचे पत्र महाविद्यालयांना पाठविले आहे. तसेच ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांची पूर्तता करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये काही खासगी महाविद्यालयांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

राज्य सरकाने गेल्या दोन-तीन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. सध्या राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामध्ये ज्या तुलनेने नवीन महाविद्यालये सुरू केली आहेत, त्या तुलनेने अध्यापकांची भरती केलेली नाही. त्यामुळे आयोग तपासणीसाठी आले असता त्या ठिकाणी एका महाविद्यालयाचे अध्यापक पाठविण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अध्यापकांची संख्या कमी असल्याचे अधोरेखित झाले. याबाबत एका अधिष्ठात्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,  आयोगाने सुचविलेल्या त्रुटी आमच्याकडे नाहीत. तरीही त्या कारणांसाठी दंड लावण्यात आला आहे. कुठल्या महाविद्यालयाला कोणता दंड कशासाठी लावला, हेसुद्धा त्या आलेल्या पत्रातून कळत नसल्याचे सांगितले.

कूपर आणि नायरही...

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महाविद्यालयांना दंड केला आहे. त्यामध्ये मुंबईतील जे. जे., कूपर आणि नायर रुग्णालयांशी संलग्न तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये जे. जे.ला ५ लाख, कूपरला ४ लाख आणि नायरला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आमच्या वैद्यकीय महाविद्यालयातील काही त्रुटींसाठी दंड ठोठावला आहे. मात्र, त्या त्रुटी दोन महिन्यांत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

आयोगाने आमच्या दोन महाविद्यालयांना दंड ठोठावला आहे. आयोगाने यापेक्षा अधिक दंड लावला होता. मात्र, आम्ही त्यांच्याशी समन्वय साधून तो दंड कमी करून घेतला आहे. तो भरण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला आहे. तसेच ज्या काही गोष्टी त्यांनी सुचविल्या आहेत. त्या पूर्ण करणार आहोत.
- डॉ नीलम अंड्राडे, संचालक, महापालिका वैद्यकीय महाविद्यालये

एचएमआयएस नसणे हे सामायिक कारण

वैद्यकीय महाविद्यालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन सिस्टिमचा (एचएमआयएस) अभाव हे दंड ठोठावण्यामागे सामायिक कारण असल्याचे सांगितले जाते.  कुटुंब दत्तक योजनेचा कमी प्रमाणात सहभाग, शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असणे, विविध विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या रुग्णालयीन कामकाजाचा ताळमेळ न बसणे, या काही कारणांमुळे खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

Web Title: 20 medical colleges fined by commission 2 months period for rectifying errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.