बेस्टचे २० कोटी राज्य सरकरकडे थकीत, सदस्यांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:35 AM2019-03-27T04:35:29+5:302019-03-27T04:35:57+5:30
आर्थिक संकटात असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार दिलेला नाही. तर नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागाने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत थोडी भर घालण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई सुरू ठेवली आहे.
मुंबई : आर्थिक संकटात असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार दिलेला नाही. तर नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागाने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत थोडी भर घालण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई सुरू ठेवली आहे. मात्र सर्वसामान्यांकडील विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी तत्काळ वीजपुरवठा खंडित करणाऱ्या प्रशासनाला राज्य सरकारकडून २० कोटींची थकबाकी अद्याप वसूल करता आलेली नाही, अशी तीव्र नाराजी बेस्ट समिती सदस्यांनी मंगळवारी व्यक्त केली.
आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील वीज खरेदी, पुरवठ्यासंदर्भातील सांख्यिकी अहवाल प्रशासनाने बेस्ट समितीला मंगळवारी सादर केला. याबाबत आपले मत मांडताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. कोट्यवधी रुपये थकविणा-या
राज्य सरकार व बड्या व्यावसायिक ग्राहकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित
केला. ऐन परीक्षेच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची वीज
खंडित करताना सरकारी यंत्रणेवर मेहेरनजर का, असा जाब
सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला विचारला.
मात्र राज्य सरकार बेस्ट उपक्रमाला वेळोवेळी मदत करीत असल्याने शासनावरच कारवाई कशी करणार, असे अजब स्पष्टीकरण महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले. मुंबई महापालिकेकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा केली आहे. वीजबिलापोटी बेस्ट उपक्रमाचे एकूण ४० कोटी रुपये थकीत असून त्यापैकी १०.२६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली असल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.
ऐन परीक्षेत विद्यार्थी अंधारात
महापालिका, राज्य सरकार व बड्या व्यावसायिकांकडे बेस्ट उपक्रमाचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. मात्र सर्वसामान्य कुटुंबाचे जेमतेम चार-पाच हजार रुपये वसूल करण्यासाठी त्यांना वेळही न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने शहर भागातील विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे. काही वीज ग्राहकांनी दागिने तारण ठेवून वीजबिल भरल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.
सेना-भाजपावर हल्लाबोल
- निवडणूक प्रक्रिया सुरू असताना बेस्टने कारवाई सुरू का केली? २० कोटी रुपये थकबाकी असलेल्या बेस्ट उपक्रमावर कारवाई करण्याची हिंमत बेस्ट प्रशासन का दाखवत नाही, असा सवाल बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी महाव्यवस्थापकांना केला.