मुंबई - ‘टीबी’ हा श्रीमंतांपासून गरिबांना कुणालाही होणार आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या टीबीवर उपचार न झाल्यास त्या रुग्णाला प्रतिरोधक टीबी होतो. या उपचारात रुग्णाला २० महिने औषधे घ्यावी लागतात. केंद्रीय आरोग्य विभागाने उपचारपद्धती विकसित केली. रुग्णांना वीस महिन्यांऐवजी ६ महिने औषधे घ्यावी लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात एमडीआर टीबीसाठी नवीन प्रभावी उपचार पद्धती सादर करण्यास मान्यता दिली आहे.
या उपचार पद्धतीस मुंबईतूनच सुरुवात होणार आहे. या नवीन उपचार पद्धतीला बीपीएएलएम असे संबोधिले जाते. यात बेडाक्विलिन, प्रीटोमॅनिड, लिनझोलिड, मोक्सिफ्लॉक्सासिन या औषधांचा समावेश आहे. एमडीआर टीबीसाठी उपचार पद्धतीमध्ये दुष्परिणामांना सामोरे जावे लागत होते. भारतातील ७५ हजार एमडीआर टीबी रुग्णांना नवीन विकसित उपचार पद्धतीचा लाभ घेता येणार आहे.
आम्ही केंद्रीय टीबी निर्मूलन अधिकाऱ्यांना यांपैकी एकही औषध आमच्याकडे नसल्या ते उपलब्ध करून देण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्याप्रमाणे औषध आल्यास नवीन उपचार पद्धती सुरू करण्यात येईल. - डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
या नवीन उपचार पद्धतीचा रुग्णांना फायदा होणार आहे. वीस महिने औषधे खाण्याचा रुग्णांना कंटाळा आल्याने रुग्ण ते उपचार अर्धवट सोडून देत होते. मात्र या नवीन उपचाराचा कोर्स रुग्ण पूर्ण करतील. या औषधाचे दुष्परिणाम फार नाहीत. - डॉ. लॅन्सलॉट पिंटो, श्वसनविकारतज्ज्ञ, हिंदुजा रुग्णालय
देशाच्या प्रगतीला चालना मिळणारआरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने, आरोग्य संशोधन विभागाशी सल्लामसलत करून या नवीन क्षयरोग उपचार पद्धतीचे प्रमाणीकरण निश्चित केले आहे. या निर्णयामुळे क्षयरोग संपवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाच्या प्रगतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.