मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्राची गती मंदावलेली असताना फेब्रुवारी महिन्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली असून, विमान कंपन्यांच्या आसनव्याप्तीच्या दराचा आलेखही उंचावला आहे.जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेमुळे देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत ४३ टक्क्यांची घट होती ती ६४.०८ लाखांपर्यंत खाली आली. डिसेंबर २०२१ मध्ये १ कोटी १२ लाख प्रवाशांनी देशांतर्गत मार्गावर प्रवास केला होता. खालावलेल्या प्रवासी संख्येमुळे विमान कंपन्या चिंतेत होत्या. मात्र, तिसऱ्या लाटेचा जोर ओसरताच हवाई वाहतूक क्षेत्रात पुन्हा एकदा आशादायक चित्र दिसून येऊ लागले आहे.नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ७६ लाख ९६ हजार प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला. जानेवारीच्या तुलनेत ही संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. शिवाय आसनव्याप्तीचा दरही या महिन्यात वाढला आहे. स्पाइसजेट, इंडिगो, विस्तार, गो फर्स्ट, एअर इंडिया आणि एअरएशिया इंडियाच्या आसनव्याप्तीचा दर फेब्रुवारीत अनुक्रमे ८९.१, ८५.२,८७.१,८७,८४.१ आणि ८३.२ टक्के इतका नोंदविण्यात आला. जानेवारी महिन्यात हा दर अनुक्रमे ७३.४, ६६.६, ६१.६, ६६.७, ६०.६, ६१.६, ६६.७, ६०.६ आणि ६०.५ टक्के इतका होता. इंडिगो नंबर वनडीजीसीएच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात इंडिगोने सर्वाधिक ३९.५१ लाख प्रवासी हाताळले. ही संख्या एकूण देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या ५१.३ टक्के इतकी आहे. शिवाय देशातील प्रमुख चार विमानतळांवर निर्धारित वेळेत उड्डाण पूर्ण करीत वक्तशीरपणातही इंडिगोने अव्वल स्थान कायम राखले आहे.जानेवारीच्या तुलनेत वाढ २०%७६,९६,000 फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत हवाई प्रवासी संख्या
देशांतर्गत हवाई प्रवासात 20% वाढ; आसनव्याप्तीच्या दराचा आलेख उंचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 8:20 AM