मुंबईत २० टक्के पाणीकपात

By admin | Published: March 29, 2015 12:03 AM2015-03-29T00:03:07+5:302015-03-29T00:03:07+5:30

तानसा मुख्य जलवाहिनी ठाणे येथे फुटल्यामुळे संपूर्ण मुंबईत आजपासून २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़

20 percent watercourse in Mumbai | मुंबईत २० टक्के पाणीकपात

मुंबईत २० टक्के पाणीकपात

Next

मुंबई : तानसा मुख्य जलवाहिनी ठाणे येथे फुटल्यामुळे संपूर्ण मुंबईत आजपासून २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़ पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू होईपर्यंत लाखो लीटर्स पाणी वाया गेले़ त्यामुळे ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत पाणीकपातीची झळ मुंबईकरांना सहन करावी लागणार आहे़
ठाणे पश्चिम येथून जाणारी १८०० मि़मी़ तानसा मुख्य जलवाहिनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक फुटली़ या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या जल अभियंता खात्यातील ५० जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ या पथकाने जलवाहिनीचा अंदाज घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे़ परंतु हे काम पूर्ण होण्यास रविवारची रात्र उलटण्याची शक्यता आहे़ या जलवाहिनीतून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा पोहोचतो़ तेथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे जलवाहिनीच्या दोन्ही बाजू बंद करून गळती नेमकी कुठून, नुकसान किती याचा अंदाज पालिकेने घेतला़ मात्र जलवाहिनी जुनी असल्याने तिलाच तडा गेल्याचे आढळून येत असल्याचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)

सप्टेंबर २०१४ : तानसा मुख्य जलवाहिनीला टिळकनगर रेल्वे स्थानक येथे तडा गेला होता़
आॅगस्ट २०१४ : दीडशे वर्षांची तानसा मुख्य जलवाहिनी ठाणे येथील वतर्कनगरमध्ये तडे गेले़ यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता़
२०१३ : मुंबईबाहेर तीन ठिकाणी तानसा जलवाहिनीला तडे गेल्यामुळे मुंबईकरांना ५० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते़


पालकमंत्री
उतरले पाण्यात
घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कमरेइतक्या पाण्यात उतरून बचावकार्यात सहकार्य केले. या संदर्भात मुंबईच्या महापौरांशी आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले असून, मुख्यमंत्र्यांनी या घटनेत बाधित झालेल्या रहिवाशांना मदत द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जलवाहिनी झाली जीर्ण
काही महिन्यांपूर्वी हीच जलवाहिनी वर्तकनगर भागातही फुटली होती. त्या वेळी येथील १०० हून अधिक झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते. तर सहा वर्षांपूर्वी बाळकुम येथेही जलवाहिनी फुटली होती. तसेच दोन वेळा प्रेशरमुळे या जलवाहिनीचे व्हॉल्व उघडण्यात आले होते. ही जलवाहिनी सुमारे २५ वर्षे जुनी असून, अनेक ठिकाणी जीर्ण झालेली आहे. त्यामुळेच ती वारंवार फुटत असल्याचे मत मुंबई महापालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे. तर ती खालील बाजूने फुटल्याने दुरुस्तीच्या कामात ठाणे महापालिकेतील स्थानिक नगरसेवकांनी यासाठी मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

वाहतूक कोंडीही
दुपारी जेवण झाल्यावर गप्पा मारत बसलेल्या रहिवाशांच्या घरात अचानक पाण्याच्या लाटा येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी घाबरून वागळे पासपोर्ट आॅफीसजवळील ब्रिजवर धाव घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह इतका होता, की हे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून मुलुंड चेकनाक्यापर्यंत रस्त्यावरही जमा झाले होते. त्यामुळे या भागात काही काळ वाहतूककोंडीही झाली होती.

जलवाहिनी फुटल्याचा फटका
येथील जवळजवळ १५ हजार लोकांना बसला असून, यामध्ये १८ जण जखमी झाले आहेत. त्यातील कमल दुकाळे, जगन गुंजाळ, महादू जगदाळे आणि रामलाल हे चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यातील चार ४ जण गंभीर असून, त्यांच्यावर ठाण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच त्यातील चार ४ जण गंभीर असून त्यांच्यावर ठाण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जलवाहीनी फुटल्याचा फटका येथील साईनाथ नगर, किसन नगर २, महात्मा गांधी नगर, शिवशक्ती नगर या भागांना बसला आहे. यातील ५ हजार रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात सनराईज बिझनेस पार्क येथे व्यवस्था करण्यात आली असून ६ हजार रहिवाशांना महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन येथे हलविण्यात आले आहे.

 

Web Title: 20 percent watercourse in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.