Join us

तीन दिवसांत विमानात बॉम्बच्या 20 अफवा; ‘विस्तारा’च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:47 PM

सकाळी ७:४५ वाजता हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून २० पेक्षा जास्त विमानांत बॉम्ब असल्याची धमकी मिळाली असून, त्यात आता विस्तारा कंपनीची भर पडली आहे. फ्रँकफर्टहून मुंबईत येणाऱ्या ‘विस्तारा’च्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावर गुरुवारी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. 

सकाळी ७:४५ वाजता हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. गेल्या तीन दिवसांत सोशल मीडियावरून २० पेक्षा जास्त धमक्या आल्या असून ‘विस्तारा’च्या विमानातील धमकीही सोशल मीडियावरूनच देण्यात आली. यानंतर हे विमान प्राधान्याने मुंबईत उतरविण्यात आले. विमानतळाच्या निर्मनुष्य परिसरात विमान नेऊन प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले.

स्पाइस जेटमध्येही बॉम्ब ठेवल्याची पोस्ट -स्पाइस जेट कंपनीच्या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर करण्यात आली. मात्र दोन्ही विमानांची तपासणी केली असता त्यात असा कोणताही प्रकार न आढळल्याने ती पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे उघड झाले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

स्पाइस जेट कंपनीचे ड्युटी मॅनेजर धनंजय गावडे (५४) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार कंपनीच्या समाजमाध्यमावर १६ ऑक्टोबर रोजी साइकवर्ड या नावाने एक ट्वीट आले. 

त्यात दरभंगा ते मुंबई आणि लेह ते दिल्ली या दोन विमानांमध्ये स्पोटके ठेवली असून लवकर विमान रिकामी करा. अन्यथा सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडतील अशा आशयाचा मजकूर नमूद होता. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी विमानांतील प्रवाशांना खाली उतरवले. विमानांच्या तपासणीत कोणतीही बॉम्बसदृश वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. 

टॅग्स :मुंबईविमानस्फोटके