मुंबई - लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, याची काही मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करता येतो. आयोगाने दरपत्रकही त्यासाठी जारी केले असून चहा, नाश्ता, जेवण, गाडी यांसाठी किती खर्च केला जावा, याचे काटेकोर नियोजनही आखून दिले आहे. या आदर्श दरपत्रकानुसार खर्च करून त्याचा हिशेब कसा सादर करायचा, हा प्रश्न दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांना पडला आहे.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेकडून अनिल देसाई तर शिंदेसेनेकडून राहुल शेवाळे निवडणूक लढवत आहेत. अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. त्यातील अणुशक्ती नगर आणि चेंबूर हे दोन मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तर उर्वरित मतदारसंघ शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येतात. या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या दरपत्रकात तफावत असल्याने नेमका दर कोणता लावायचा आणि हिशेब काय द्यायचा, असा प्रश्न आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे दर पाहिले की उपनगरातील निवडणूक तुलनेने स्वस्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याचे सर्व वस्तूंचे दर समान असावेत का, या विषयावर सध्या काथ्याकूट सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
तफावत अशी...शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघांत खुर्चीचा खर्च २० रुपयांप्रमाणे मोजण्यात येतो तर उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन विधानसभांमध्ये खुर्चीचा दर १० रुपये आहे. शहरात चहा २०, वडापाव २५, पुलाव १२० तर याच पदार्थाचे दर उपनगरांत अनुक्रमे १०, १५, ७५ रुपये असा आहे. तर शहरात ५० आसनी बससाठी (प्रतिदिन १०० किमी) दर ८,४६८ तर उपनगरात बससाठी दर ११,५०० आहेत.