पाच राज्यांतील निवडणुकांवर महाराष्ट्रातील २० वरिष्ठ आयपीएस अधिकारी ठेवणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:36+5:302021-03-04T04:09:36+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने साेपवली जबाबदारी जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या ...
केंद्रीय निवडणूक आयोगाने साेपवली जबाबदारी
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर महाराष्ट्रातील २० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. त्याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. आयोगाने बुधवारी संबंधितांशी ऑनलाइन संपर्क साधला.
पाच राज्यांत महाराष्ट्रातील ५ एडीजी, ६ आयजीपी व ९ डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांना पाठविले जाईल. विधान मतदारसंघात त्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून आयोगाने निवड केली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू व पाँडेचरी या राज्यांत मार्च व एप्रिलमध्ये विविध टप्प्यांत मतदान होईल. निकाल २ मे रोजी जाहीर होणार असून, त्यासाठी अन्य राज्यांतून आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. राज्यातील २० आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठविली होती. त्यात काही बदल करून सध्या अकार्यकारीपदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश केला आहे.
परराज्यांतील निवडणुकांसाठी कार्यकारीपदावर कार्यरत नसलेल्या अधिकाऱ्यांची नावे पाठविली जातात. मात्र, यावेळी त्यामध्ये अप्पर महासंचालक के.के. सारंगल, संजीव सिघल, रेल्वेचे आयुक्त कैसर खालीद, नाशिकचे आयुक्त दीपक पांड्ये, पिपरी चिंचवडचे कृष्ण प्रकाश व एटीएसमध्ये कार्यरत उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांचा समावेश होता. त्यापैकी लांडे वगळता अन्य अधिकाऱ्यांची नावे रद्द करण्यात आली. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचा शोध घेत असलेल्या एटीएसच्या अधिकाऱ्याचे नाव कायम ठेवले.
या अधिकाऱ्यांवर जबाबदारी
अप्पर महासंचालक- प्रशांत बुरडे, देवेन भारती, अनुपकुमार सिग, सुनील रामानंद व नवल बजाज, विशेष महानिरीक्षक- प्रवीण साळुंखे, मधुकर पांड्ये, डॉ. रवींद्र सिंघल, रवींद्र शेणगावकर, मकरंद रानडे, एम.के. भोसले.
उपमहानिरीक्षक/अप्पर आयुक्त- डॉ. जय जाधव, एम.आर. घुर्ये, एस.एच. महावरकर, हरीश बैजल, संजय एनपुरे, जालिंदर सुपेकर, आर.बी. डहाळे, शिवदीप लांडे व वीरेंद्र मिश्रा.