श्रीकांत जाधव/ मुंबई : मतदान प्रक्रियेत मतदारांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला शाई लावली जाते. उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चारही मतदारसंघातील मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यासाठी शाईच्या २० हजार २६७ बाटल्यांची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी येथे दिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७२ लाख २८ हजार ४०३ मतदार आहेत. तर मतदान केंद्रांची संख्या सात हजार ३५३ एवढी आहे. याशिवाय २७ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रियेत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटाला शाई लावली जाते. ही शाई पुसली जाऊ नये म्हणून तिच्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या काही दिवसानंतरही ही शाई पुसली जात नाही.
यामुळे एक मतदार एकदाच मतदान करू शकतो. ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते. मतदाराने मतदान केल्यानंतर मतदानासाठी नियुक्त अधिकारी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर ही शाई लावतात. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात ही शाई पूर्णपणे कोरडी होवून तिची बोटावर खूण उमटते. शाई लावलेले बोट पाण्याच्या संपर्कात आल्यावर या शाईचा रंग काळा होतो. हैदराबाद आणि म्हैसूर येथे या शाईची निर्मिती केली जाते अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांनी दिली.