मुंबई : २०२० च्या पावसाळ्यामध्ये जून व जुलै महिन्यात मुंबईसपाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये फक्त सुमारे ३४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सदर जलसाठा जुलै २०१९ मध्ये ८५.६८ टक्के व जुलै २०१८ मध्ये ८३.३० टक्के होता.
हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळा संपल्यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात दिनांक ५ ऑगस्ट २०२० पासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
सदर पाणीकपात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणा-या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा न्याय पद्धतीने वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.