मुंबई : एचआयव्ही आणि एड्सने बाधित असलेल्या रुग्णांना उपचार देणाऱ्या जे जे रुग्णलयातील अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ए.आर.टी. सेंटर) केंद्राला २० वर्षे पूर्ण झाली. भारतात प्रथम अशा पद्धतीचे केंद्र जे. जे. रुग्णालयात सुरू करण्यात आले होते. त्यानंतर देशभरातील इतर रुग्णालयात सुरू करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने जे. जे. रुग्णलयात सोमवारी औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी या ठिकाणी उपचार घेणाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
२००४ साली हा विभाग मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. अलका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला होता. या केंद्राला २० वर्षे पूर्ण झाल्याने मेडिसिन विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी उपसंचालक डॉ. विजयकुमार करंजकर, डॉ. धीरूभाई राठोड आणि या केंद्राच्या समन्वय अधिकारी आणि मेडिसिन विभाग प्राध्यापक डॉ. प्रिया पाटील आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
अँटीरेट्रोव्हायरल थेरपी या आजरांवर फार कमी ठिकाणी उपचार मिळत असल्याने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. एड्सबाधितांना उपचाराचा भाग म्हणून अँटीरेट्रोव्हायरल थेरपी दिली जाते. यामध्ये रुग्णांना विविध या आजारांशी संबंधित औषधे दिली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने या औषधामुळे शरीरामधील एचआयव्ही विषाणूंची संख्या कमी होते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. हा आजर नियंत्रणात ठेवण्याकरिता चांगली औषधे आता रुग्णालयात उपलब्ध आहेत. या औषधांमुळे रुग्ण सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. मात्र त्यांना याकरिता नियमित औषधे अनेक वर्षासाठी घ्यावी लागतात. तसेच त्या संबधी रक्तचाचण्या या सुद्धा करून डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा लागतो.
४३ हजार रुग्णांवर उपचारगेल्या २० वर्षांत ४३, ०८० रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आजही या केंद्रात २० वर्षांपासून उपचार घेणारे रुग्ण आहेत, जे या कार्यक्रमाला हजर होते. त्यांचावर याच रुग्णालयात काही शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या आहेत. पूर्वी एचआयव्हीचे रुग्ण म्हटले की, त्यांना उपचार देतानासुद्धा वेगळी वागणूक दिली जायची, मात्र आता पूर्ण चित्र बदलले आहे. या रुग्णांना सर्वसामान्य रुग्णांसारखी वागणूक देऊन उपचार दिले जातात.