मुंबई - मालाडमधील (पश्चिम) माईंडस्पेस परिसराजवळ झाडाझुडपात एका बॅगमध्ये 20 वर्षीय मॉडेलचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मानसी दीक्षित असे हत्या करण्यात आलेल्या मॉडेलचं नाव आहे. मानसीचा मृतदेह असलेली बॅग ताब्यात घेतल्यानंतर केवळ 4 तासांच्या आतच बांगूर नगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली. मुझम्मिल सईद (वय 19 वर्ष) असे आरोपीचं नाव असून तो अंधेरीतील (पश्चिम) मिल्लत नगर येथील रहिवासी आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मानसीचा मित्रच निघाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून मानसी आणि मुझम्मिलची मैत्री झाली होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस मानसी आणि मुझम्मिलमध्ये काही कारणांवरुन वाद झाला आणि मुझम्मिलनं रागाच्या भरात मानसीचे डोके स्टूलवर आपटले. या घटनेत अजाणतेपणे मानसीचा मृत्यू झाला. मानसी ही मूळची राजस्थानची रहिवासी होती. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून ती अंधेरीमध्ये (पश्चिम) वास्तव्यास होती.
घटनास्थळावर बेवारस अवस्थेत बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तिथे धाव घेतली. बॅगमध्ये त्यांना मानसीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर जखम आढळून आली. तिचा मृतदेह बेडशिटनं गुंडाळून बॅगमध्ये भरण्यात आला होता. मानसीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून, पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली. सीसीटीव्हीच्या मदतीनं त्यांना गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळावर एका व्यक्तीनं रस्त्याच्या शेजारी बॅग फेकल्याचे आढळले.
या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि मुझम्मिलच्या मुसक्या आवळल्या. मुझम्मिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.