मुंबई : प्रदूषण कमी करून पर्यावरण आणखी समृद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यादृष्टीने पालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पर्यावरण संतुलनासाठी २०० बहावा वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
पालिकेचे वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत २४ जून रोजी २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता हे वृक्षारोपण होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अक्षय कुमार त्यांचे दिवंगत वडील हरीओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.‘निसर्गाचे पालक बना’ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी, सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे.पाच लाख बांबू लागवडीचा संकल्प -प्रदूषण कमी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या बांबूच्या झाडांचीही लागवड आगामी काळात केली जाणार आहे. संपूर्ण मुंबईत पाच लाख बांबू लागवडीचा संकल्प पालिकेने सोडला आहे.