मुंबई : गणित सोडविणे अनेक मुलांना आवडत नाही, पण रविवारी मुंबईत पाहिलेले चित्र पाहून अनेक जण थक्क झाले. कारण ४ ते १४ वयोगटांतील अनेक विद्यार्थ्यांनी फक्त ८ मिनिटांत तब्बल २०० गणिते सोडवून अनेकांना थक्क केले. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये १४व्या राज्यस्तरीय मानसिक अंकगणित स्पर्धा २०१८ चे आयोजन केले होते.या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल ४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान मुलांची एकाग्रता चांगली असते, त्यांच्या मेंदूची वाढ सतत होत असते. या वयात मुलांना मेंदूचा वापर कसा करावा, स्मरणशक्ती वाढविण्याचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना सर्वच प्रकारे हे उपयुक्त ठरते. गणित हा त्यातील एक भाग आहे, असे आयोजक सी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन आरसी बॉम्बे चर्चचे सचिव फादर जॉर्ज अॅथाईड यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी अॅथाईड म्हणाले की, राज्यातील अबॅकस प्रेमींच्या अशा प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यासारख्या स्पर्धा क्रीडा स्पर्धेपेक्षा कमी नाही, जेथे स्पर्धकांना सावध असणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जलद होणे आवश्यक आहे. ते विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षण वेळेच्या स्वरूपात लागू करण्यासाठी एक व्यासपीठ देतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जे शिकले आहे, ते प्राप्त करण्यासाठी त्यांना आव्हान दिले जाते.अबॅकस पद्धती मेंदूच्या विकासासाठी आणि मानसिक अंकगणित प्रशिक्षणात मदतीचे ठरते. ४ ते १४ वर्षांच्या मुलांना सोप्या पद्धतीने अंकगणिताचे प्रशिक्षण यात दिले जाते. कौशल्य, सर्जनशीलता, ऐकीव आणि फोटोग्राफिक मेमरी यासारख्या कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणली जाते.
फक्त आठ मिनिटांत सोडविली २०० गणिते, मेंदूच्या विकासासाठी अबॅकस पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:50 AM