Join us  

केडीएमटीत २०० वाहक - चालक भरणार

By admin | Published: February 09, 2016 2:41 AM

केडीएमटी उपक्रमाला चालक आणि वाहकांची जाणवत असलेली कमतरता पाहता सोमवारी पार पडलेल्या परिवहन समितीच्या सभेत २०० चालक आणि वाहकांच्या पदनिर्मितीला

कल्याण : केडीएमटी उपक्रमाला चालक आणि वाहकांची जाणवत असलेली कमतरता पाहता सोमवारी पार पडलेल्या परिवहन समितीच्या सभेत २०० चालक आणि वाहकांच्या पदनिर्मितीला सर्वपक्षीय मान्यता देण्यात आली. परिवहन उपक्र माकडून कंत्राटी पद्धतीवर ६ महिने कालावधीकरिता १०० चालक आणि वाहकांची भरती करण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु, सदस्यांनी दाखल केलेल्या उपसूचनेनुसार या पदांमध्ये वाढ करून संबंधित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.पूर्वीच्या १०० आणि १० व्होल्वो एसी बसेस अशा एकूण ११० बसेससाठी व ब्रेकडाऊन व्हॅन, मार्ग तपासणी वाहन व कार्यालयीन वाहनासाठी कमी पडणारा आवश्यक चालक कर्मचारीवर्ग संपूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीवर ६ महिने कालावधीकरिता ११० चालकपदांच्या निर्मितीस मान्यतेसंदर्भातला प्रस्ताव परिवहन उपक्रमाने आणला होता. दरम्यान, महिनाभरापूर्वी महापौर, आयुक्त, परिवहन सभापती आणि सदस्य यांच्या पार पडलेल्या बैठकीत २०० वाहक आणि चालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याकडे लक्ष वेधून २०० ऐवजी १०० पदांचा प्रस्ताव का आणला, असा सवाल परिवहन सदस्यांनी प्रशासनाला केला. यावर, समाधानकारक खुलासा संबंधित अधिकाऱ्यांना करता आला नाही. उपक्रमाच्या आस्थापनेवरील मंजूर १३७७ पदांपैकी राज्य शासनाने केवळ ५७५ पदांना मंजुरी दिली असून ८०२ पदे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. चालकांची ५१३ पदे असून शासनाने २१५ पदांना मंजुरी दिली आहे, तर २९८ पदे रिक्त आहेत. शासन बसेसना मंजुरी देते, परंतु त्यासाठी चालक आणि वाहक अपुरे पडतात.