मेट्रो सातच्या खर्चात 200 कोटींनी वाढ; दोन पॅकेजमध्ये झाली अतिरिक्त कामे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 02:08 AM2020-11-10T02:08:58+5:302020-11-10T06:57:27+5:30
वाढीव खर्चाला प्राधिकरणाची मंजुरी
मुंबई : अंधेरी ते दहिसर या मेट्राे सातच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच यातील दोन पॅकेजमधील अतिरिक्त कामांमुळे खर्चात तब्बल २०० कोटींनी वाढ झाली. पॅकेज दोन आणि तीनच्या कामासाठी ६०९ कोटी खर्च अपेक्षित होता. तो आता ८०९ कोटी झाला. मंजूर निविदेतील खर्चापेक्षा २० टक्के जास्त खर्च होत असेल तर त्याला मंजुरी देण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना आहेत. मात्र, ही वाढ जवळपास ३२ टक्के असल्याने त्याला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी घ्यावी लागली.
जानेवारी, २०२१ मध्ये प्रकल्पाची चाचणी घेऊन मे, २०२१ पर्यंत प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. या प्रकल्पातील पॅकेज - २ चे काम जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्टर (३६० कोटी) तर पॅकेज तीनचे काम एनसीसी लिमिटेड (२४९ कोटी) या कंपन्यांना दिले. त्यांना प्रकल्प अहवालात अंतर्भूत नसलेली परंतु, निकडीची अतिरिक्त कामे करावी लागली. त्यामुळे त्यांचे अनुक्रमे ११६ कोटी आणि ८० कोटी जास्त खर्च झाल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.
nबहुतांश ठिकाणी अपेक्षित डिझाईन स्ट्रेन्थ न मिळणे (१० कोटी), मार्गिका मीरा-भाईंदरपर्यंत वाढविण्यासाठी आवश्यक असलेली जोडणी (३० कोटी) यांसारखी कामे करावी लागली. काही स्थानकांची लांबी-रुंदी आणि क्षेत्रफळ, जिन्यांची संख्या वाढविणे, संरक्षक भिंती उभारणे आदी कामांवरही अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला.