Join us  

२०० डबलडेकरना दिवाळीचा मुहूर्त! ७०० गाड्यांचा करार रद्दचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 7:23 AM

स्वीच मोबिलिटी कंपनीचा बेस्ट उपक्रमासोबत  ७०० डबलडेकर बस पुरविण्याचा करार रद्द झाला

रतींद्र नाईकमुंबई :

मोठा गाजावाजा करत मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने लंडनच्या धर्तीवर चालणारी एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेसाठी आणण्याचा निर्णय घेतला असून बोटावर मोजण्याइतपत डबलडेकर बस मुंबईच्या रस्त्यांवरून धावत आहेत.  स्वीच मोबिलिटी कंपनीचा बेस्ट उपक्रमासोबत  ७०० डबलडेकर बस पुरविण्याचा करार रद्द झाला असून याचा परिणाम बेस्टच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात येणाऱ्या २०० डबलडेकर गाड्यांवर झाला आहे. लवकरच मुंबईत आणखी डबलडेकर बस येणार, अशी आशा मुंबईकरांना होती, मात्र या २०० डबलडेकर बसना दिवाळी उजाडणार आहे.  

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ४५  डबलडेकर बस आहेत. मात्र, या बसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित डबलडेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांना किफायतशीर सेवा पुरविण्याचे काम बेस्ट उपक्रम करत असून १२ फेब्रुवारी रोजी बेस्टच्या ताफ्यात पहिली एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाली. २१ फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी ही बस धावत असून पहिल्या टप्प्यात २०० बस दाखल होणार होत्या. मात्र, कंपनीने तांत्रिक कारण पुढे करत बेस्टला ७०० एसी बस पुरविण्यास नकार दिला. त्यामुळे बेस्ट उपक्रम अडचणीत आला असून याचा परिणाम २०० एसी बसवर झाला आहे. ७०० बस व्यतिरिक्त २०० बस बेस्टच्या ताफ्यात येणार होत्या, या बस पावसाळ्यापूर्वी येतील अशी चर्चा होती. मात्र, आता या बसना दिवाळीपर्यंत ताफ्यात येतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

बस जेवढ्या विलंबाने कंपनी बेस्ट उपक्रमाला पुरवेल त्यानुसार दंड आकारण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.

२०० एसी डबलडेकर बस पहिल्या टप्प्यात यायला हव्या होत्या. मात्र अद्याप त्या आलेल्या नाहीत. मुंबईत या बस कधी पोहोचतील हे पुरवठादार कंपनीच सांगू शकेल. दिवाळीपर्यंत २०० डबलडेकर बस मुंबईत येतील.- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

...ही आहेत बसची वैशिष्ट्येया बस स्वीच मोबिलिटी या कंपनीच्या आहेत. इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असून धावताना त्यांचा अजिबात आवाज होत नाही.चेन्नई येथे या बस तयार झाल्या असून मुंबईकरांना या बसचे विशेष आकर्षण आहे. एकाचवेळी १०० प्रवासी प्रवास करू शकतात.

टॅग्स :बेस्ट