Join us

दुबईत अडकलेले २०० कोकणी नागरिक युनायटेड कोकणच्या प्रयत्नांनी मुंबईत दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:31 PM

शेकडो कोकणी महाराष्ट्रीयन नागरिक नुकतेच तीन विशेष विमानांनी मुंबईत दाखल झाले.

 

खलील गिरकर

मुंबई : विविध कारणांनी दुबईत गेलेल्या व कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाल्याने तिथेच अडकलेले शेकडो कोकणी महाराष्ट्रीयन नागरिक नुकतेच तीन विशेष विमानांनी मुंबईत दाखल झाले. कोकणी नागरिकांना मुंबई मध्ये परतण्यासाठी विमाने उपलब्ध होत नसल्याने युनायटेड कोकण या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करुन तीन विशेष विमानांची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्या माध्यमातून सुमारे 200 प्रवासी मायदेशी परतले. सबीना शेख, दिलावर दलवाई, खालीद मुकादम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्तार पालेकर, नौशाद पटेल, नजीर हुरझुक यांचेही यामध्ये सहकार्य लाभले.  दुबई मध्ये भारतातून विशेषत: कोकणातून 90 हजार पेक्षा अधिक नागरिक कामानिमित्त व व्यापारानिमित्त स्थायिक आहेत. मार्च पासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्याने कामासाठी, कामाच्या शोधासाठी व इतर घरगुती कारणांमुळे दुबईत व्हिजिट व्हिसावर दुबईत गेलेले नागरिक तिथे अडकले आहेत. व्हिसाची मुदत संपुष्टात येत असल्याने नागरिकांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही जणांची नोकरी गेल्याने त्यांना घरी परतण्याची आस लागली होती. अशा प्रकारे सुमारे एक हजार पेक्षा अधिक नागरिक दुबईत अडकले आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईतून येणाऱ्या विमानांची संख्या कमी असल्याने या प्रवाशांच्या समस्येत आणखी वाढ झाली. काही रुग्णांना,  गरोदर महिलांना मुंबईत परतायचे होते. काही जणांच्या कुटुंबियांचे निधन झाल्याने त्यांना घरा यायचे होते. अनेक नागरिक काम शोधण्यासाठी व्हिजिट व्हिसा च्या माध्यमातून दुबईत आले.  मात्र नेमका लॉकडाऊन सुरु झाल्याने त्यांना रोजगार मिळू शकला नाही. मात्र विमान सेवा बंद असल्याने त्यांना मायदेशी परतण्याची संधी देखील मिळत नव्हती त्यामुळे या नागरिकांना मायदेशी मुंबईत परतण्यासाठी विशेष विमानांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विडा युनायटेड कोकणच्या या सक्रिय कार्यकर्त्यांनी उचलला. आपापली नोकरी, उद्योग सांभाळत सामाजिक दायित्व म्हणून या सर्वांनी आवश्यक त्या सर्व पातळीवर प्रयत्न करुन तीन विमानांची सुविधा उपलब्ध करण्यात शेवटी यश मिळवले.  या माध्यमातून सुमारे दोनशे नागरिक मुंबईत परतलेे. मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पसरले.

याबाबत सबीना शेख म्हणाल्या,  दुबईत विविध कारणांमुळे अडकलेल्या कोकणी नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी आम्हाला मदत करता आली याचे आम्हाला समाधान आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारे इतरांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन शेख यांनी केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस