Join us

‘निसर्ग’ मार्गावर एकावेळी २०० व्यक्तींना प्रवेश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 05:40 IST

Mumbai News: मलबार हिल येथे उभारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

 मुंबई - मलबार हिल येथे उभारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार असून, येथे जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

निसर्गाचा समतोल राखत हा मार्ग पालिकेने साकारला असून, उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. त्याचबरोबर पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. 

सुरक्षेच्या दृष्टीने येथे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. पर्यावरणीय दृष्ट्या नियमित स्वच्छतेस प्राधान्य आणि परीरक्षणाच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

ऑनलाइन नोंदणी, ॲक्सेस कंट्रोल सीस्टिम विकसितनिसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. भारतीयांसाठी २५ रुपये, तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आहे. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे स्लॉट आहेत. ऑनलाइन तिकीट नोंदणीतील बारकोडवर प्रवेश आणि निर्गमसाठीचा पर्याय दिला आहे. 

पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी ॲक्सेस कंट्रोल सीस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे, तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :मुंबईनिसर्ग