२०० विद्यार्थ्यांना मिळाले चक्क शून्य मार्कच; विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:44 AM2023-04-23T10:44:49+5:302023-04-23T10:45:10+5:30
विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांत चांगले गुण आहेत. मात्र, एकाच विषयात ०० आरआर गुण मिळाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईविद्यापीठाने तृतीय वर्ष बीएमएसच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पब्लिक रिलेशन (सीसीपीआर) या विषयात विद्यार्थ्यांना शून्य आरआर (रिझल्ट रिझर्व्ह) गुण दिले आहेत. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या निकालावर २१६ विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला असून, युवा सेनेने देखील परीक्षा विभाग संचालकांना पत्र पाठवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.
विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांत चांगले गुण आहेत. मात्र, एकाच विषयात ०० आरआर गुण मिळाले आहेत. युवा सेनेने या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विद्यापीठातील प्रभारी कारभारामुळेच अशा चुका वारंवार होत असल्याची टीका केली. युवा सेना सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांना पत्र पाठवून हा गोंधळ निदर्शनास आणून देत पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे.
विद्यापीठाचैे म्हणणे...
पेपरची तपासणी ऑनलाइन करण्यात येते. या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक, विषय कोड, पेपर कोड अशी माहिती चुकीची लिहिली आहे. त्यामुळे पेपर कोणत्या विषयाचा आहे हे कळत नाही. म्हणून निकालात त्या विषयाच्या जागी शून्य आरआर नमूद आहे. याचा अर्थ संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने पाहिल्यावर सीसीपीआर गोंधळ दूर होईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.