आम्ही बांधलेल्या रस्त्यांवर 200 वर्षं खड्डे पडणार नाहीत; भर पावसात गडकरी गरजले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:08 PM2019-11-01T22:08:45+5:302019-11-01T22:10:29+5:30
'पर्यावरण, वातावरण आणि विकासाचे प्रकल्प एकात्मिकपणे राबविण्याची आवश्यकता आहे.'
- गौरीशंकर घाळे
मुंबई : एरवी दिवाळीनंतरच्या उबदार वातावरणात रंगणारा 'पार्ले कट्टा' शुक्रवारी धो धो पावसाने अक्षरशः भिजून गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपस्थित पार्लेकरांनी छत्रीच्या आडोशातच मुलाखतीचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी गडकरी यांनी देशभरातील पायाभूत विकासकामांचा आढावा घेतला. भाजपा सरकारच्या काळात देशभर पायाभूत सुविधांचा विकास झाला. एकट्या महाराष्ट्रात एक लाख कोटींची कामे सुरू आहेत. रस्ते बनवताना दर्जाही राखला आहे. सिमेंट काँक्रीटच्या आमच्या रस्त्यांवर दोनशे वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावा गडकरी यांनी केला.
पर्यावरण, वातावरण आणि विकासाचे प्रकल्प एकात्मिकपणे राबविण्याची आवश्यकता आहे. विकासकामे व्हावीत यासाठी आग्रह धरणाऱ्यांपेक्षा कामे करू नका म्हणत विरोधाची भूमिका घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे मोठी आहे. वांद्रे वरळी सी लिंकला ज्या पद्धतीने विरोध झाला त्यामुळे या प्रकल्पाची किंमत प्रचंड वाढली. त्यामुळे सी लिंकचा टोल आता कायमच मुंबईकरांच्या नशिबी आला आहे. एकात्मिक भूमिका न घेतल्यास मुंबईतील प्रकल्पांबाबत जे घडले, घडत आहे तसे देशभर होईल, असे गडकरी म्हणाले.
नवीन मोटार वाहन कायद्याबाबत गडकरी म्हणाले की, हा कायदा महसूल वाढविण्यासाठी नसून रस्ते अपघातांना बळी पडण्यापासून लोकांना वाचविण्यासाठी आहे. भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. तर अडीच लाख दिव्यांग होतात. नव्या दुरुस्तीमुळे लोकांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि भीती निर्माण होईल. रस्ते अपघात कमी होतील, असेही गडकरी म्हणाले. महसूल गोळा करण्यासाठी नव्हे तर अपघात रोखण्यासाठी नवा कायदा आहे. कायदा पाळतील त्यांच्यावर दंड भरायची वेळच येणार नसल्याचे ते म्हणाले.