दोन हजारांची नोटबंदी अन् गुन्हेगारांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:01 PM2023-06-06T13:01:15+5:302023-06-06T13:01:47+5:30

याचाच फायदा घेत भामटे व्यापाऱ्यांच्या या पैशांवर डल्ला मारत असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत.

2000 demonetization and the crime in city | दोन हजारांची नोटबंदी अन् गुन्हेगारांची लगबग

दोन हजारांची नोटबंदी अन् गुन्हेगारांची लगबग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाही चलनातून बाद करण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकने केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांमध्ये धाव घेतली. याचाच फायदा घेत परराज्यातील व्यापारी मुंबईच्या बाजारात नोटा बदलण्यासाठी येताना दिसत आहेत. बहुतांश ठिकाणी कमिशन देऊन या नोटा बदलण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे याचाच फायदा घेत भामटे व्यापाऱ्यांच्या या पैशांवर डल्ला मारत असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत.

४२ लाखांवर डल्ला....

झवेरी बाजारातील व्यापाऱ्याला दागिने देण्याच्या बहाण्याने त्यांची ४२ लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला लोकमान्य टिळक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजस्थानमध्ये दोन दिवस पाळत ठेवून आरोपीला अटक केली. हुकूमसिंग राजपूत आणि छत्तरसिंग राजपूत अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ लाख आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. व्यापाऱ्याने दोन हजारांच्या नोटा दिल्याने, त्या भारतीय चलनातून बंद करण्यात आल्या असल्याने व्यापारी तक्रार देणार नाही असा समज करत त्यांनी रकमेचा अपहार केल्याचे पोलिसांना सांगितले.

अन् थेट बनावट नोटा घेऊन बँकेत...

दहिसर येथील रहिवासी असलेले ३५ वर्षीय तक्रारदार हे एका खासगी बॅंकेच्या ताडदेव येथील शाखेमध्ये व्यवस्थापक आहेत. व्यवसायाने सेल्समन असलेला मुंब्रा येथील रहिवासी शेख हा २६ मे च्या दुपारी तीनच्या सुमारास दोन हजार रुपयांच्या दहा नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेत आला. त्याने अर्ज भरून नोटा बदलण्यासाठी बॅंकेतील कॅशिअरकडे दिल्या. कॅशियरने नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही तपासणी केली तर त्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. नागपाड्यातील दुकानाचे मालक इसरार शेख  यांनी त्या नोटा  जमा करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ताडदेव पोलिस ठाणे गाठून  लेखी तक्रार दिली आहे.

नोटा बदलण्यासाठी परराज्यातील व्यापारी मुंबईत

मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेल्या तक्रारदार हरिराम धनाराम घोटिया (३१) यांचा ज्वेलरी कामाचा व्यवसाय आहे. घोटिया हे सध्या हैद्राबादमध्ये वास्तव्यास असून गेल्या आठवड्यात ते खासगी बसने मुंबईत आले. घोटिया यांच्याकडे दोन हजारांच्या नोटांची २७ लाखांची रक्कम आणि १ कोटी १० लाखांची सोन्याची बिस्किटे तसेच, सव्वा कोटींची हिरेजडीत दागिने होते. घोटिया आणि त्यांचे सहकारी उतरताच त्यांना एका चौकडीने दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून ताब्यात घेतले. या लुटारूंनी त्यांच्याकडील एकूण २ कोटी ६२ लाख किमतीचा ऐवज काढून घेत पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवत सायन पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले. गुन्ह्यात एका ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याची माहिती समोर येत असून पोलिस पथकाने काही जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.

मार्केटमध्ये उलाढाल...

- मुंबईतील मोठ्या बाजारात परराज्यातील व्यापाऱ्यांची  या नोटा बदली करण्यासाठी लगबग वाढत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

गोल्डमध्ये गुंतवणूक

-  झवेरी बाजार सारख्या बड्या बाजारात काही मंडळी गोल्डमध्ये गुंतवणूक करत काळा पैसा पांढरा करत आहेत.
 
-  कमिशन स्वरूपात मोठ्या प्रमाणात याचे व्यवहार सुरू असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.


 

Web Title: 2000 demonetization and the crime in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.