राज्यात म्युकरमायकोसीसचे 2 हजार बाधित रुग्ण, 8 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:06 PM2021-05-11T14:06:26+5:302021-05-11T14:07:11+5:30
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजारासाठीचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे.
मुंबई - कोविड १९ च्या पश्चात म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराबाबत नागरिकांनी सर्तकता बाळगण्याची गरज असून, लवकरच या आजाराचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतुन केले जाणार आहेत. याविषयीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यात म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याचे 2 हजार रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजारासाठीचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. या आजाराची लक्षणे ही नाक, ओठाजवळ काळे डाग पडतात. हे डाग दिसल्यास तात्काळ उपचार सुरु केले पाहिजेत. हा आजार मेंदू तसेच डोळ्यांना इजा पोहचवू शकतो. या आजारावरील औषधी म्हणजेच एमपी- एंपोथेरिसीन सर्वत्र उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यामुळे या औषधाच्या किंमती अडीच हजार रूपयांवरून थेट सहा हजार रूपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन लवकरच हे १४ डोस लागणाऱ्या इंजेक्शनचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
Mucormycosis patients will be treated for free under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana. Over 2,000 cases have been reported & 8 people have died of this infection in the state so far. We are making special wards for these patients: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/XnAT9loG5F
— ANI (@ANI) May 11, 2021
राज्यात या रोगाचे आत्तापर्यंत 2 हजार रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, या रोगासाठी विशेष वार्डची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
रूग्णालयांच्या बिलांची तपासणीसाठी कर्मचारी नेमणार
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत अनेक खासगी रूग्णालय हे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकचे शुल्क आणि बिल आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याामुळे आता दरररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत सरकारी कर्मचारी कोविड सेंटरवर तैनात करण्यात येणार आहे. त्यांनी बिलावर स्वाक्षरी केल्यावरच ते बिल रूग्णालयात भरावे लागणार आहे. जालन्या प्रमाणेच अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची नोंद घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले.