मुंबई - कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी कांदिवली पोलिसांनी २ हजार पानी आरोपपत्र बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्टात फाईल केले. चारकोपच्या शिवम रुग्णालयाचे मालक डॉक्टर शिवराज पतरिया आणि त्यांची पत्नी नीता पतरिया हे या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून त्यात सहा प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदविण्यात आला आहे जे शिवम रुग्णालयाचे कर्मचारी आहेत.
कांदिवली (पश्चिम) येथील हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलात खासगी केंद्रामार्फत झालेले लसीकरण बोगस असल्याचे उजेडात आले होते. या प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार कांदिवलीतील लसीकरण केंद्रांवर ३९० जणांना लस देण्यात आली.
कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशीदेखील सुरू केली. या चौकशीत असे एकूण नऊ बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे समोर आले.
लसीकरणाच्या अशा बोगस प्रकरणांमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले. या नागरिकांना लसीऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आले. या लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराची पोलिसांमार्फत सखोल चौकशी सुरू आहे.