Join us

बनावट लसीकरणातून २ हजार जणांची फसवणूक; हायकोर्टाला दिली माहिती, मुंबईतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 7:18 AM

सध्या याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा अहवालही ठाकरे यांनी न्यायालयात दाखल केला.

मुंबई : कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरणाची शिबिरे घेऊन २,०५३ नागरिकांची फसवणूक करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.आतापर्यंत मुंबईत नऊ बनावट लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली आणि याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व  न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.

सध्या याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा अहवालही ठाकरे यांनी न्यायालयात दाखल केला. कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण शिबिरप्रकरणी संबंधित डॉक्टरांची माहिती मिळवताना ४०० साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यात कमीत कमी २,०५३ नागरिकांना फसवण्यात आले आहे. या बनावट लसीकरण शिबिरांप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींची ओळख पटली असून, अनेक अज्ञात लोकांनाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे यांनी न्यायालयाला दिली.

‘त्या’ नागरिकांच्या  आराेग्याचे काय?

मुंबईत भरविण्यात आलेल्या नऊ बनावट लसीकरण शिबिरांमध्ये लस घेतलेल्या नागरिकांचे काय? त्यांना लसीच्या नावाखाली काय देण्यात आले आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे? याची आम्हाला चिंता आहे, असे न्यायालयाने म्हटले. त्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांच्या तपासणीसाठी काय करणार आहात? अशी विचारणाही न्यायालयाने पालिकेकडे केली.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिका