Join us

हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 05:47 IST

काहींना परतीचे वेध तर काही जणांचा टूर पूर्ण करण्याचा निर्धार पक्का, दोन दिवसांत प्रवासाबाबत स्थिती स्पष्ट होणार

योगेश बिडवई 

मुंबई : काश्मीरच्या पहलगामजवळील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. विमान व रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडले जात आहे. काश्मीरला महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक पर्यटक भेट देतात. सध्या तेथे दोन्ही राज्यांतील सुमारे २० हजार पर्यटक असल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने (एमटीओए) ‘लोकमत’ला दिली. 

श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग या भागात पर्यटक विशेषत: भेट देतात. हल्ल्यानंतर आता वातावरण निवळत आहे. दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला गेल्याने सध्या तेथे व्हीआयपी मूव्हमेंट सुरू असल्याचे ‘एमटीओए’चे अध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी सांगितले. एप्रिल-मे हा तेथील पर्यटनाचा हंगाम असल्याने देशभरातील लाखो पर्यटक सध्या तेथे असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

काश्मीर भारतातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन केंद्र आहे. महाराष्ट्र, गुजरात या दोन्ही राज्यांतील २० ते २२ हजार पर्यटक सध्या काश्मीरमध्ये असतील. मागील ७२ वर्षांपासून आम्ही काश्मीरला पर्यटक नेतो. गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच असा मोठा हल्ला झाला आहे. मात्र, परिस्थिती लवकरच सर्वसामान्य होईल, असा विश्वास आहे.  विश्वजीत पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशन

आम्ही गुजरातमधून मोठ्या प्रमाणात काश्मीरला पर्यटक घेऊन जातो. हा दहशतवादी हल्ला म्हणजे पर्यटनातील एक ‘स्पीडब्रेकर’ आहे. केंद्र सरकार यावर मात करेल. अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. तोपर्यंत स्थिती आणखी सुधारेल. यावर्षी काश्मीरला तब्बल ३ कोटी पर्यटकांनी भेट दिली. हा एक विक्रम आहे. सतीश शाह, पर्यटन व्यावसायिक

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लापर्यटन