हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल क्षेत्रात २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:39+5:302021-07-09T04:06:39+5:30

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या ...

20,000 youths will get training in healthcare, nursing and paramedical fields | हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल क्षेत्रात २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल क्षेत्रात २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण

Next

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करत आहोत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालविणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसेल, तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरू केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले.

योजनेसाठी साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. योजनेचे महत्त्व लक्षात घेता, उर्वरित निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.

कौशल्य विकासमंत्री मलिक म्हणाले की, या योजनेतून २० हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल.

Web Title: 20,000 youths will get training in healthcare, nursing and paramedical fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.