Join us

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 3:43 AM

विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली.

मुंबई : विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारीच सर्व आरोपींना मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची तंबी दिल्यानंतर गुरुवारच्या सुनावणीत भाजपची भोपाळची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिली.उच्च न्यायालय, त्यानंतर विशेष न्यायालयानेही या खटल्यास विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. दरम्यान, विशेष न्यायालयाने आरोपींमुळे खटल्याला विलंब होत असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. त्यासंदर्भात एक गोपनीय अहवालही सादर केला.या सर्व प्रकारानंतर गुरुवारी भाजपची भोपाळची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने न्यायालयात हजेरी लावली. ती हजर राहिल्याची नोंद घेतल्यानंतर न्यायालयाने तिला जाण्यास सांगितले. न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ठाकूरने सांगितले की, न्यायालय जेव्हा आपणास हजर राहण्यास सांगेल, तेव्हा आपण न्यायालयात हजर राहू.ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात लोक या प्रकरणी आरोपी आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जखमी झाले. बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती मोटारसायकल ठाकूरच्या नावे होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटप्रज्ञा सिंह ठाकूर