भोपाळ/मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या मुंबईतील न्यायालयात या आठवड्यात दुसऱ्यांदा उपस्थित राहू शकल्या नाहीत. न्यायालयात हजर न राहण्याचा त्यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला व त्याच वेळी त्यांना शुक्रवारी हजर राहावे लागेल, असे स्पष्ट केले.
ठाकूर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असून, त्या भोपाळहून मुंबईला प्रवास करू शकत नाहीत, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. ठाकूर यांना बुधवारी रात्री पोट दुखत असल्याच्या कारणावरून रुग्णालयात दाखल करण्यात येऊन दुसºया दिवशी घरी जाण्याची परवानगी दिली गेली, असे त्यांच्या जवळच्या सहायक उपमा यांनी सांगितले.
भोपाळमधील कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर ठाकूर रुग्णालयात परत येतील. २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात उपस्थित राहावे, असा आदेश त्यांना देण्यात आला होता. खासदार ठाकूर यांची प्रकृती बरी नसून त्यांना बुधवारी रात्री रुग्णालयात ठेवावे लागले. त्यांना पोटदुखीची तक्रार आहे. त्यांना इंजेक्शनद्वारे औषधे दिली गेली.
गुरुवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली गेली. पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीवरून ठाकूर यांनी कार्यक्रमात भाग घेतला. परंतु त्यांना तात्काळ रुग्णालयात न्यावे लागणार आहे, असे उपमा म्हणाले. ठाकूर यांना या आठवड्यात न्यायालयात हजर राहण्यातून सूट मिळण्यासाठी त्यांनी केलेला अर्ज सोमवारी विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता.