२०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:17 PM2024-03-04T19:17:25+5:302024-03-04T19:19:35+5:30
२०१९ मध्ये सकाळी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती.
BJP Ashish Shelar ( Marathi News ) : महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत अभूतपूर्व राजकीय स्थिती पाहायला मिळाली. आधी अनपेक्षितपणे निर्माण झालेली महाविकास आघाडी आणि नंतर शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. २०१९ मध्ये सकाळी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळेही राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. या शपथविधीआधी आमची राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच सविस्तर चर्चा झाली होती, असा दावा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जातो. मात्र हा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठीच केला होता, असा गौप्यस्फोट आज भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपने देखील २०१९ साली राष्ट्रवादीसोबत शपथविधीचा प्रयत्न केला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी म्हटलं होतं की, "ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना दंडित करण्याचं काम आम्ही केलं. २०१९ चा शपथविधी हा शरद पवार यांना धक्का देण्यासाठी होता. राष्ट्रवादी पक्ष त्यावेळी फुटला असता तर त्याच वेळी फोडला असता," असा खळबळजनक दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
पुढे बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, "२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजप आणि शिवसेनेला कौल दिला होता. मात्र ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना आम्हाला दंडित करायचं होतं. आम्ही तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार बनवत नव्हतो तर अजित पवारांसोबत सरकार बनवत होतो," असं शेलार म्हणाले.
दरम्यान, आशिष शेलार यांच्या या वक्तव्याबाबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.