मुंबई - शिवसेना 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी मिळाली आहे. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर हा ठराव मांडण्यात आला. यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान ठराव मांडले जाण्याआधी पार पडलेल्या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंना मात्र यंदाही नेतेपद मिळालेलं नाही. सध्या शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत, दिवाकर रावते आणि गजानन कीर्तिकर हे आठ नेते आहेत. त्यातील दोन-तीन जणांना वगळून नवीन चेहरे दिले जातील आणि त्यात आदित्य यांचाही समावेश असेल, अशी सुत्रांची माहिती होती.