मुंबई : देशातील २६ लाख नागरिकांचा मृत्यू २०२० सालापर्यंत कोरोनरी हृदयविकारामुळे होईल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिज तरुण प्रौढांमध्येही दिसून येत असून, हृदयविकाराच्या झटक्यामध्ये त्याचे योगदान अंदाजे ८० टक्के असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालात समोर आली आहे.
कार्डिओव्हस्क्युलर आजार हे विकसनशील व विकसित देशांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे एक कारण आहे. सन २०३० पर्यंत कार्डिओव्हस्क्युलर मृत्यूंचे प्रमाण १३७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच सर्व कोरोनरी हृदयविकारांमुळे मृत्यू पावणाºया नागरिकांमध्ये ३० ते ६९ वर्षे वयोगटातील तरुण व मध्यमवयीन व्यक्तींची संख्या जवळपास निम्म्याहून अधिक आहे. पाश्चिमात्य देशांत मात्र या वयोगटातील मृत्यूंची संख्या केवळ २३ टक्के आहे. म्हणूनच या विकाराला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक रुग्ण म्हणून नव्हे, तर एक पाहुणा म्हणून रुग्णालयात लवकर निदान होण्यासाठी जाण्याची गरज स्पेशालिस्ट डॉ. पूरबी कोच यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कोरोनरी आर्टरी डिसिजला प्रतिबंध करण्यासाठी आणि दीर्घकालीन धोका टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग हेल्थ चेक-अप गरजेचे आहे. हा एक जीवनशैलीविषयक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, तीन चतुर्थांश कार्डिओव्हस्क्युलर आजार केवळ जीवनशैलीमुळे रोखता येऊ शकतात. हृदय तरुण राहण्यासाठी काय खात आहोत, त्याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. आरोग्यदायी पदार्थ खात, खेळ खेळणे, योग करणे, चालणे अशा प्रक्रिया रोज करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.यंदाची संकल्पना ‘माय हार्ट, युवर हार्ट’29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन असून तो वर्ल्ड हार्ट फेडरेशनने कार्डिआक आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी सुरू केलेला जागतिक उपक्रम आहे. जागतिक हृदय दिन-२०१८ निमित्ताने फेडरेशनने ‘माय हार्ट, युवर हार्ट’ ही मध्यवर्ती संकल्पना सुरू केली आहे.