Join us

२०३० पर्यंत मुंबईची विजेची मागणी सुमारे ५ हजार मेगावॅटपर्यंत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 5:13 PM

Electricity demand : विजेचा दर माफक

मुंबई : २०३० पर्यंत मुंबईची विजेची मागणी सुमारे ५ हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबईला अखंडीत वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वीज निर्मितीमध्ये वाढ करणे, त्यासाठीचे नियोजन, त्याचा उत्पादन दर काय असेल आदींबाबत विचार सुरु आहे. सध्या टाटा वीज प्रकल्पातील दोन संच बंद असून त्यातून अधिकची वीजनिर्मिती करता येईल. तसेच तयार होणाऱ्या विजेचा दर माफक असेल आदींबाबतही विचार करण्यात येत आहे.मुंबईची विजेची गरज भागविण्यासाठी सध्या रॅडिकल ट्रान्समिशन पद्धतीने वीज आणली जाते. एखादी अतिउच्च दाब वीजवाहिनी नादुरस्त झाल्यास अडचणी उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात रिंग लाईन करण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे.  तसेच यासाठी ८ लाईन कॉरिडॉर निर्माण केले जाऊ शकतात. मुंबईतील अंतर्गत वीज निर्मिती वाढवावी लागेल. टाटा पॉवर ही सध्या मुंबईला १३३९ मे वॅट इतकी वीज पुरवठा करते. त्यामुळे टाटाने आणखी वीज निर्मिती वाढविणे गरजेचे आहे. आणि यावर आणखी लक्ष केंद्रित केले जात आहे.  १९८१ मध्ये मुंबईला नियमित  वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने टाटाने आयलँडिंगची संकल्पना आणली. प्रत्यक्षात मुंबईची आजची गरज ही दुपटीने वाढली असून वीजनिर्मिती क्षमता कमी झाली असून राज्यातील इतर भागातून मुंबईला वीजपुरवठा करावा लागतो. त्यामुळे आयलॅडींग राबवितांना अनेक उणीवा राहिल्या आहेत. वीज उत्पादन, वहन आणि वितरण व्यवस्थांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करुन खर्चात बचत करणे आणि त्याच्या आधारे ग्राहकांना माफक दरात वीज पुरवठा करणे या व्हिजननुसार काम सुरु आहे. 

 

टॅग्स :वीजमहावितरणमुंबईटाटासरकार