राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी
By संतोष आंधळे | Published: October 10, 2022 10:11 PM2022-10-10T22:11:59+5:302022-10-10T22:12:15+5:30
स्वाईन फ्लू हा एक श्वसनसंबंधी रोग असून डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे.
मुंबई : कोरोना ची साथ कमी होत असतानाच स्वाईन फ्लूच्या साथीने जोर धरला होता. गेल्या दहा महिन्यात राज्यात ३ हजार ५८५ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात अधिक ४६ मृत्यू हे पुणे जिल्ह्यात आहे तर मुंबई या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
स्वाईन फ्लू हा एक श्वसनसंबंधी रोग असून डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. यालाच इन्फ्लुएंझा ए ला एच1एन1 व्हायरस म्हणतात. हा आजार संक्रमित व्यक्तीच्या शिंकताना आणि खोकल्यावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे होतो. हा विषाणू घसा आणि फुफ्फसांवर हल्ला करतो. या आजारावरील उपचार पद्धतीची डॉक्टरांना माहिती आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहिले पाहिजे.
गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आजराने प्रमाणेच स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. या मध्ये सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजारात ताप, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश आहे.