Join us

हुक्का पार्लरवरील कारवाईत २०४ जणांना बेड्या

By admin | Published: October 16, 2016 3:10 AM

समाजसेवा शाखेने मुंबईतील मालाड, बोरीवली, जोगेश्वरी , चर्नीरोड आणि माझगाव परिसरातील हुक्का पार्लरवर केलेल्या कारवाईत २०४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

मुंबई : समाजसेवा शाखेने मुंबईतील मालाड, बोरीवली, जोगेश्वरी , चर्नीरोड आणि माझगाव परिसरातील हुक्का पार्लरवर केलेल्या कारवाईत २०४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अंमलबजावणी विभागाचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शुक्रवारी चर्नीरोड येथील ‘रॉयल पफ’ हुक्का पार्लरवर समाजसेवा शाखेने छापा टाकला. यामध्ये ५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चर्नीरोड येथील टाटा रोड परिसरातील पारस सेंटर इमारतीत हे हुक्का पार्लर सुरू होते. त्या पाठोपाठ मालाडच्या लिंक रोड परिसरातील ‘फ्युल पंप’वर टाकलेल्या छाप्यात दोन चालक, मॅनेजर यांच्यासह २६ पुरुष आणि ६ महिला ग्राहकांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले. जोगेश्वरीच्या टॉल ग्रास कॅफे, बोरीवलीतील वाइब्ज कॉफी सेंटरचाही यामध्ये सहभाग आहे, तसेच माझगाव येथील क्लाउड ७ आणि ब्लॅक डायमंड कॅफेवरही समाजसेवा शाखेच्या पथकाने कारवाई केली. समाजसेवा शाखेने टाकलेल्या ६ ठिकाणच्या छाप्यांमध्ये २०४ जणांवर कारवाई केली. त्यामुळे अन्य छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लर चालकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेने दिली. (प्रतिनिधी)