मुंबई : गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या नवीन रुग्णाच्या निदानाच्या संख्येत वाढ झाली असून सोमवारी २०५ नवीन रुग्णांचे निदान राज्यात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ११० रुग्ण घरी बरे होऊन गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८१ टक्के एवढे झाले आहे. सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचे २,२१२ सक्रिय रुग्ण आहेत.
सध्याच्या कोरोनासंदर्भातील आंतराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोरोनासाठी घेण्यात येत आहे. यापैकी कोरोनाबाधित प्रत्येक नमुना जनुकीय कर्मनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. आज सकाळपर्यंत विमानतळावर एकूण १५, ७४, ०४४ प्रवासी आले असून त्यापैकी ३५, ०३१ प्रवाशांचे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.