टिप्स कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:13+5:302021-06-22T04:06:13+5:30
खार पोलिसांत गुन्हा दाखल : कांदिवलीतील टोळीचाच समावेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवलीतील बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने खारमध्येही ...
खार पोलिसांत गुन्हा दाखल : कांदिवलीतील टोळीचाच समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीतील बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने खारमध्येही २०६ जणांना इंजेक्शनमार्फत भेसळयुक्त द्रव पदार्थ टोचत लाखोंचा गंडा घातल्याचे सोमवारी उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून फसवणूक झालेले टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय आहेत.
खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी राजेश पांडे, संजय गुप्ता आणि त्यांच्या साथीदारांनी कोकिलाबेन हॉस्पिटलतर्फे लसीकरण शिबीर आयोजित करीत असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली. त्यानुसार ते कार्यरत असलेल्या टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत २०६ कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ३ आणि ४ जून रोजी ती टोचून घेतली. मात्र कांदिवलीचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर आपल्याला देखील लस प्रमाणपत्र दिले नसल्याने त्यांना संशय आल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कडबुले यांनी सांगितले. त्यानुसार याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.