Join us

विकासासाठी २०६ वृक्षांची छाटणी; प्रस्ताव मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरणासमोर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 6:01 AM

विकासकामांच्या आड येणाऱ्या आणखी २०६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. यामध्ये मेट्रो रेल प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.

मुंबई : विकासकामांच्या आड येणाऱ्या आणखी २०६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. यामध्ये मेट्रो रेल प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.मालाड पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत ३३ झाडे तोडण्यात येणार आहेत. यापैकी १२ झाडे मृत तर २३ तोडण्यात व पाच पुनर्राेपित करण्यात येणार आहेत. दहिसर पश्चिम येथील इमारत बांधकामासाठी १४३ झाडे तोडणे, यापैकी २७ पुनर्राेपित सहा झाडे तशीच ठेवण्यात येणार आहेत. मेट्रो रेल प्रकल्पात ३० झाडे तोडण्यात येतील, यापैकी २२ पुनर्राेपित करण्यात येतील. विकासकामांमध्ये बाधित ठरणारी झाडे तोडण्यात येतात. यामुळे मात्र मुंबईतील हिरवा पट्टा नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीस विरोध होत असतो. यापूर्वी मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावांना सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला आहे. या प्रस्तावावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये प्रस्तावित आहे. कारशेडसाठी २ हजार ७०२ झाडे तोडली जाणार आहेत.मात्र येथील वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. वृक्षतोडीबाबत १० आॅक्टोबरला सुनावणी होणार असून, याप्रकरणी मुंबई महापालिकेने सूचना आणि हरकती पाठविण्याचे आवाहन मुंबईकरांना केले होते. मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांकडून पंधरा हजारांहून अधिक सूचना करत येथील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.मुंबईबाहेरील नागरिकांच्याही सूचना व हरकतीआरेमधील कारडेपोस विरोध वाढतच असून, सेव्ह आरे, सेव्ह ट्री आणि वनशक्ती या पर्यावरणवादी संस्था याप्रकरणी आंदोलन छेडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईबाहेरील नागरिकांनी महापालिकेकडे सूचना आणि हरकती दाखल केल्या असून, यात ठाण्यातील नागरिकांचाही समावेश आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरेमधील कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येथील २ हजार ७०२ वृक्ष तोडण्याची परवानगी कॉर्पोरेशनने महापालिकेकडे मागितली आहे. त्यावर महापालिकेने याबाबतचे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.मुंबई महापालिकेच्या वृक्ष गणनेनुसार येथील वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजार २८३ आहे. शिवाय आरे कॉलनीमध्ये ४ लाख २० हजार वृक्ष आहेत. आणि मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक माणसामागे येथील वृक्षांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

टॅग्स :मुंबई