कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा वेग मात्र थंडावण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल २०६ शाळांनी सरकार आणि महापालिकेची मान्यता न घेताच शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा तातडीने बंद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच संबंधित शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मनपा किंवा खासगी शाळेत दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. यानंतरही सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करत काही संस्थाचालक शाळा चालवत आहेत. सरकारी नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानंतरही संस्थाचालक शाळा सुरूच ठेवतात. दरवर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांची यादी जाहीर होते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शिक्षण विभागाने २३१ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती, तर २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २११ शाळा बेकायदा जाहीर केल्या होत्या. यंदा या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा २०६ शाळा बेकायदा म्हणून जाहीर केल्या आहेत. या शाळांमधील बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळील मनपा किंवा मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
....... .....
सर्वाधिक अनधिकृत शाळा मानखुर्द गोवंडी परिसरात
अनधिकृत ठरविलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमासह हिंदी, मराठी, उर्दू या तीन भाषेच्या शाळांचीच संख्या अधिक आहे. पालिकेच्या एम, पूर्व विभागामध्ये म्हणजेच मानखुर्द, गोवंडी परिसरामध्ये सर्वाधिक ६७ बेकायदा शाळा आहेत. त्याखालोखाल पी, नॉर्थ म्हणजेच मालाड-मालवणी, पठाणवाडी या परिसरात १८ शाळा, एस वॉर्ड म्हणजे विक्रोळी-भांडूप परिसरात १५, एफ, नॉर्थ म्हणजे वडाळा, अॅटॉप हिल, सायन कोळीवाडा या भागामध्ये १४, एल म्हणजे कुर्ला भागामध्ये १२, आर-साउथ म्हणजे कांदिवलीमधील १० शाळा बेकायदा असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे. बहुतेक शाळा या पहिली ते चौथीपर्यंतच्या आहेत, तर साधारण २० ते २५ शाळा पाचवी ते आठवीच्या आहेत.
प्रत्यक्ष कारवाईवर प्रश्नचिन्ह
पालिका दरवर्षी अनधिकृत शाळांची माहिती जाहीर करते. अनेक शाळांची नावे दरवर्षी अनधिकृत शाळांच्या यादीत असतात. अनधिकृत शाळांकडून १ लाख रुपये दंड वसूल करण्यात येतो. मात्र अनेक शाळांसाठी १ लाख रुपये ही रक्कम दोन किंवा तीन विद्यार्थ्यांचे शुल्क आहे. त्यामुळे शाळांवर कारवाईचा फारसा फरक पडत नाही. गेल्या वर्षीही २११ शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली होती. मात्र, करोना प्रादुर्भावानंतर शाळांची सुनावणी आणि त्यांच्यावरील कारवाई थंडावली. यंदा तर शाळाच बंद असल्याने कारवाई करणे मुश्किल झाले असल्याचे मत अधिकारी व्यक्त करत आहेत.
.....
अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे काय ?
शाळांवर कारवाई करणे सोपे आहे मात्र त्यावेळी तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळी शाळांना दंडाची रक्कम कारवाई म्हणून सुरुवातीला सुनावली जाऊन कालावधी दिला जातो . दरम्यान, अनेक शाळा या कालावधीत मान्यता घेऊन कागदपत्रांची सोय करतात, अशी महिती अधिकाऱ्यांनी दिली.
.....
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळा
२०१८-१९- २३१
२०१९-२०-२११
२०२०-२१ -२०६