मुंबई- कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ' रिइन्व्हेटींग अजिंठा - थ्रू द काॅपीज मेड इन अर्ली 20 सेंच्युरी' या विशेष कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, या निमित्ताने अभ्यासक, संशोधक आणि कलारसिकांसह विद्यार्थ्यांना विसाव्या शतकातील अंजिठा वेरुळ लेणीची भेट डिजिटल माध्यमातून घेता येणार आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सय्यद अहमद यांनी तयार केलेल्या लेणीतील दस्ताऐवजीकरणाचा खजिना उलगडण्यात आला आहे. संग्रहालयाकडे या लेणीतील ४३ चित्रांचा हा खजिना आहे, या प्रदर्शनाची खासियत असणारी लेण्यांची डिजिटल भेट हा प्रकल्प आयआयटी मुंबई, केंद्रीय सांस्कृतिक विभाग यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.
अजिंठा वेरुळ लेणीतील १९ व्या आणि विसाव्या शतकातील मूळ चित्रे आणि संग्रह-संवर्धनासाठी त्याच्या तयार केलेल्या चित्रकृती दोन्ही एकाच वेळी कलारसिकांना अनुभवता येणार आहे. या माध्यमातून मूळ कलाकृतींतील बारकावे, सृजनशीलता, कल्पकता न्याहाळताना येणारे अडथळे पाहता आता त्यांच्या प्रतींच्या माध्यमातून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. विविध प्रक्रियांचा आधार घेऊन लेण्यांमधील या प्रती संवर्धित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संग्रहालयातील प्रदर्शनाच्या क्युरेटर वंदना प्रापना यांनी दिली आहे.
व्हर्च्युअल एक्सपरीमेंटल म्युझिअमची पर्वणी
अजिंठा वेरुळ लेण्यांचे जतन संवर्धनाचे काम केंद्रीय सांस्कृतिक विभाग, केंद्र शासन आणि आयआयटी मुंबईच्या वतीने एका विशेष प्रकल्पाद्वारे सुरु आहे. या संस्थांनी मिळून लेण्यांच्या जतन संवर्धनाला वेगळे आयाम दिले आहे. या प्रकल्पातून पहिल्यांदाच व्हर्च्युअल एक्सपरीमेंटलची जोड देऊन कला रसिकांना थेट लेण्यांना भेट देऊन कलाकृती न्याहाळत असल्याचा अनुभव घेता येणार आहे. दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात ही पर्वणी कला रसिकांसाठी उपलब्ध आहे.