15 जूनला विखे पाटील 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेणार

By Admin | Published: June 12, 2017 06:11 PM2017-06-12T18:11:23+5:302017-06-12T18:11:23+5:30

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबीयांनी अहमदनगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेणार

On 20th June, Vikhe Patil will adopt 208 farmers for suicidal families | 15 जूनला विखे पाटील 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेणार

15 जूनला विखे पाटील 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेणार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबीयांनी अहमदनगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेणार असून, येत्या 15 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर येथील नंदनवन लॉन्सवर हा कार्यक्रम होईल. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा 15 जून रोजी जन्मदिन आहे. या दिवशी विखे पाटील कुटुंबीयांकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन झाल्याने यावेळी त्यांच्या नावाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत विखे पाटील कुटुंबाकडून चालविल्या जाणाऱ्या जनसेवा फाऊंडेशनमार्फत अहमदनगर जिल्ह्यात नोव्हेंबर 2014 पासून आत्महत्या केलेल्या 208 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. योजनेसंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ शासकीय अनुदानास पात्र ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची पत्नी, आई-वडील, मुले-मुली यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा आदी जबाबदाऱ्या विखे पाटील कुटूंब स्वीकारणार आहे. याशिवाय या 208 शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित शेतकरी कुटुंबाचे घर राहण्यास योग्य नसेल तर त्यांना घर दुरुस्तीसाठीही सहकार्य केले जाणार आहे. शिवाय या कुटुंबांचा अपघात विमा देखील काढला जाणार आहे. दिवंगत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना भक्कम आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेच्या माध्यमातून हाच वसा आम्ही पुढे कायम ठेवणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील म्हटले आहे.

15 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात संबंधित 208 कुटुंबेही सहभागी होणार आहेत. सदरहू कुटुंबांचे मागील 2 महिन्यांपासून सर्वेक्षण सुरू होते. या कुटुंबांना मिळालेली शासकीय मदत पुरेशी नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसमोरील असंख्य अडचणी पाहता सामाजिक बांधिलकी व नैतिक जबाबदारी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार देणारी योजना व्यक्तीगत पातळीवर सुरू करण्याचे कदाचित हे देशातील पहिलेच उदाहरण असावे. पांगरमल येथील विषारी दारू कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांनाही या कार्यक्रमात प्रत्येकी 25 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.

Web Title: On 20th June, Vikhe Patil will adopt 208 farmers for suicidal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.