Join us

बीडीडी चाळीतील २१ रहिवाशांना मिळणार संक्रमण शिबिराच्या चाव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 1:46 AM

ना. म. जोशी मार्ग : तीनशे रहिवाशांसोबत करार पूर्ण

मुंबई : ना़ म़ जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील २१ रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या चाव्या शनिवारी म्हाडा देणार आहे़ प्रकाश कॉटन मिल, वेस्टर्न इंडिया मिल आणि भारत मिल येथील जागेवरील संक्रमण शिबिरामध्ये त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे हे स्थलांतर असून, उर्वरित पात्र रहिवाशांना टप्प्याने संक्रमण शिबिरात पाठविले जाणार आहे़ हा कार्यक्रम सायंकाळी ६.०० वाजता ललित कलाभवन मैदान, डिलाइल रोड येथे पार पडणार आहे.

राज्य सरकारने म्हाडामार्फत बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात केली आहे. वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींपैकी वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्रतेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, करारनामे करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. ना.म.जोशी मार्ग येथे एकूण ३२ चाळी आहेत. यातील सात चाळींमधील रहिवाशांच्या पात्रतेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. येथील ५६० पैकी ४५१ जणांच्या पात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, १०९ जणांच्या पात्रतेची प्रक्रियेबाबत कारवाई अद्याप सुरू असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

४५१ जणांपैकी ३०० जणांसोबत करारनामे करण्यात आले असून, त्यापैकी १७५ जणांसोबत ऑनलाइन करार करण्यात आले आहेत. ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये सात वर्षांमध्ये होणार असून, या प्रकल्पाला २ हजार ४३९ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प होत आहे, आता प्रत्यक्षात गती आली आहे. आता अडीच ते तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे, असे ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.

टॅग्स :म्हाडा