मुंबईतून तब्बल २१ कोटींचे युरेनियम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:27+5:302021-05-07T04:06:27+5:30
एटीएसच्या नागपाडा पथकाची कारवाई; ग्राहकांच्या शोधात असताना दोघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून सात ...
एटीएसच्या नागपाडा पथकाची कारवाई; ग्राहकांच्या शोधात असताना दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून सात किलो युरेनियमसह दोघांना अटक केली. युरेनियम अत्यंत धोकादायक असून, किरणोत्सर्ग करणाऱ्या या पदार्थाचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत २१ कोटी ३० लाख इतकी आहे. ही दुक्कल युरेनियम खरेदीसाठी ग्राहकांच्या शोधात असताना एटीएसच्या नागपाडा पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांना ठाण्यातील जिगर पंड्या (वय २७) नावाची व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. भालेकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून पंड्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मानखुर्दच्या अबू ताहिर अफजल चौधरीने (२७) हे तुकडे पुरविल्याचे समाेर आले. त्यानुसार एटीएसच्या नागपाडा युनिटने अबुला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने ते तुकडे मंडाला येथील कुर्ला स्क्रॅप मर्चट असोसिएशन (मानखुर्द) लोहार गल्लीत ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार, तेथून ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत २१ कोटी ३० लाख आहे.
जप्त केलेले तुकडे चाचणीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले. चाचणीत हा पदार्थ नैसर्गिक स्वरूपातील आणि शुद्ध युरेनियम असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ताे मानवी जीवितास अतिशय धोकादायक असल्याचे समाेर आले. त्यानंतर या दोघांविरोधात अणुऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
आरोपींना हे युरेनियम आहे हे कसे समजले? तसेच त्यांनी हे कोठून व कसे तयार केले? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एटीएसचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी सांगितले. नागपाडा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत आणि अंमलदार मुल्ला, धावले, पांडे यांनी ही कामगिरी केली.
* खासगी प्रयोगशाळेची घेतली मदत
दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडील धातू हा युरेनियमच आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्यांचा मोर्चा त्या प्रयोगशाळेकडे वळविला आहे. प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच या दोन्ही आरोपींनी हा घातक पदार्थ आणल्याचा संशय आहे.
......................................