‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:15 AM2018-04-21T03:15:32+5:302018-04-21T03:15:32+5:30
मुंबईमध्ये ५४ लाख असे लोक आहेत ज्यांना रेशन कार्डवर धान्य मिळते, मात्र २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना आधार कार्ड लिंक नसल्यामुळे धान्य मिळत नाही. जे लाभार्थी आहेत पण त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक झालेले नाही.
मुंबई : मुंबईमध्ये ५४ लाख असे लोक आहेत ज्यांना रेशन कार्डवर धान्य मिळते, मात्र २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना आधार कार्ड लिंक नसल्यामुळे धान्य मिळत नाही. जे लाभार्थी आहेत पण त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक झालेले नाही. त्यामुळे त्यांचा अंगठा मशीनशी जुळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की, आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्याची सक्ती नको; मात्र तरीदेखील भाजपा सरकारने सक्ती केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, भिवंडीतील जनतेला ३ ते ४ महिने धान्य मिळत नाही, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
संजय निरुपम म्हणाले, रेशन दुकानातील ईपोस मशीन खराब आहेत. काही ठिकाणी मशीन बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्कची मोठी समस्या आहे, त्यामुळे या मशीन चालत नाहीत. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्याचे काम फक्त ५० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्याचे काम संपूर्ण होत नाही, जोपर्यंत सर्व ईपोस मशीन व्यवस्थित सुरू होत नाहीत, तोपर्यंत भाजपा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. मुंबई आणि ठाण्यामध्ये ४ हजार २०० रेशन दुकाने आहेत. आॅगस्ट २०१७मध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रत्येक रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आल्या आहेत, मात्र या मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे. रेशन आहे, धान्य आहे, लाभार्थी आहेत.. फक्त आधार कार्ड लिंक नसल्यामुळे धान्य दिले जात नाही. परिणामी, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्याचा आदेश भाजपा सरकारने मागे घ्यावा. दरम्यान, रेशन दुकानधारकांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. कारण यामध्ये त्यांची काहीच चूक नाही, असेही ते म्हणाले.