म्हाडाच्या २१ इमारती अतिधोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:18+5:302021-06-09T04:08:18+5:30
म्हाडा; २१ इमारती अतिधोकादायक, पावसाळापूर्व सर्वेक्षण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळापूर्व सर्वेक्षणाअंती म्हाडाने जुन्या आणि जीर्ण अशा पाच ...
म्हाडा; २१ इमारती अतिधोकादायक, पावसाळापूर्व सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळापूर्व सर्वेक्षणाअंती म्हाडाने जुन्या आणि जीर्ण अशा पाच हजार इमारतींचे सर्वेक्षण केले असून, यात २१ इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत. गेल्या वर्षीच्या दहा इमारतींचा या २१ इमारतींमध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे. तत्पूर्वी ९ हजार ४८ इमारतींच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती एकही इमारत धोकादायक अथवा अतिधोकादायक आढळली नव्हती.
पावसाळापूर्व सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील अतिधोकादायक इमारतींपैकी दोन ते तीन इमारतींमध्ये भाडेकरू राहत आहेत. बाकी इमारतींमधील रहिवाशांनी घरे रिकामी केली आहेत. येथे राहत असलेल्या रहिवाशांना पत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यांना पत्र दिल्यानंतर घरे रिकामी केल्यावर संबंधितांना संक्रमण शिबिर दिले जाईल. २१ इमारतींची पाहणी केली जाईल. आसपासच्या लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मनुष्य आणि वित्तहानी होणार नाही, यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
* अशी आहे संक्रमण शिबिरांची व्यवस्था
- शहरात ५० ते ६०, तर उपनगरात १५० संक्रमण शिबिरे आहेत. आणखी काही ठिकाणी काम सुरू आहे. सुमारे २५० संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
* रहिवासी ऐकत नाहीत!
आम्ही वारंवार सांगूनही रहिवासी घर सोडत नाहीत. आमचे ऐकत नाहीत. लोकप्रतिनिधींचे, पोलिसांचेही ऐकत नाहीत. मात्र, आता बुधवारपासून त्यांना नोटीस देणे आणि बाकीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. आम्ही समिती नेमली आहे. सदर इमारती बांधण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत आहोत. संक्रमण शिबिरांचा अभ्यास सुरू आहे. लॉटरीमधील किती घरे उपलब्ध होतील, याचाही विचार सुरू आहे.
- विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
* काहींनी स्वत:हून केली पर्यायी व्यवस्था
- अतिधोकादायक इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी असे एकूण ७१७ रहिवासी आहेत. यापैकी १९३ निवासी रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० निवासी रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित २४७ निवासी रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
* अतिधोकादायक २१ इमारतींची यादी
इमारत क्रमांक १४४ , एमजी रोड, अ - ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक १३३ बी बाबुलाल टॅंक रोड, बेग मोहम्मद चाळ, इमारत क्रमांक ५४ उमरखाडी, पहिली गल्ली छत्री हाउस, इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड, (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक ७४ निजाम स्ट्रीट, (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक १२३, किका स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक १६६ डी मुंबादेवी रोड, (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक २ - ४ ए , २ री भोईवाडा लेन, इमारत क्रमांक ४२ मशीद स्ट्रीट, इमारत क्रमांक १४ भंडारी स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक ६४ - ६४ ए भंडारी स्ट्रीट, मुंबई, इमारत क्रमांक १ - ३ - ५ संत सेना महाराज मार्ग, इमारत क्रमांक ३ सोनापूर २ री क्रॉस लेन, इमारत क्रमांक २ - ४ सोराबजी संतुक लेन, इमारत क्रमांक ३८७ - ३९१, बदाम वाडी व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक ३९१ डी बदाम वाडी, व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक २७३ - २८१ फॉकलँड रोड, डी, २२९९ - २३०१ (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक १, खेतवाडी १२ वी गल्ली (डी ) २०४९ (मागील वर्षीच्या यादीतील), इमारत क्रमांक ३१ - सी व ३३ - ए रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी, इमारत क्रमांक १०४-१०६ मेघजी बिल्डिंग अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग, इमारत क्रमांक १५ - १९ के. के. मार्ग व १ - ३ पायस स्ट्रीट
-------------