Join us

भारतीय खलाशांचा २१ महिन्यांचा पगार थकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:05 AM

इराणच्या कंपनीचा कारनामा; ५० हून अधिक तरुणांची फसवणूक; अडीच कोटी अडकलेसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इराणमधील ...

इराणच्या कंपनीचा कारनामा; ५० हून अधिक तरुणांची फसवणूक; अडीच कोटी अडकले

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इराणमधील जहाज कंपनीने भारतीय खलाशांचा २१ महिन्यांचा पगार थकविल्याची माहिती समोर आली आहे. यात देशभरातील ५० तरुणांचा समावेश असून, थकीत रक्कम अडीच कोटींहून अधिक असल्याचे कळते.

जहाजावर नोकरी मिळविण्यासाठी या तरुणांनी एका दलालाला प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिले. सप्टेंबर २०१९ मध्ये इराणमधील एका जहाज कंपनीशी त्याने ११ महिन्यांचा करार करून दिला. ३०० ते ३५० डॉलर प्रतिमहिना पगाराचे आश्वासन दिले. त्यामुळे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या तरुणांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आसू उमलले. प्रत्यक्षात इराणमध्ये पोहोचल्यावर मात्र त्यांचा हिरमोड झाला. कारण बरेच महिने सेवा दिल्यानंतरही पगार मिळेना. वारंवार चौकशी केल्यानंतर ११ महिन्यांचा पगार एकत्रित देणार असल्याचे मालकाकडून सांगण्यात आले.

११ महिने पूर्ण होताच पगार देऊन नोकरीतून मुक्त करण्याची मागणी या तरुणांनी केली असता वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करण्यात आली. पासपोर्ट हरविल्याचे सांगत त्यांना जवळपास २१ महिने बिनापगारी राबवून घेण्यात आले. परराष्ट्र मंत्रालय आणि ऑल इंडिया सीफेररर्स युनियनच्या मदतीने त्यांनी जहाजावरून सुटका करून घेतली; पण श्रमाचे मोल परत आणता न आल्याने हे तरुण दुःखी आहेत. ज्या एजंटने त्यांचा करार करून दिला होता तोही पैसे घेऊन पसार झाला आहे. त्याचे कार्यालय बंद आहे. मात्र, डी. जी. शिपींगकडे पाठपुरावा करून सर्व तरुणांचे पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऑल इंडिया सीफेररर्स युनियनचे अध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले.

............

पैसे परत मिळविण्यासाठी काय करावे लागेल?

- डी. जी. शिपिंगने संबंधित कंपनीविरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतल्यास पैसे परत मिळविता येतील. त्यासाठी फसवणूक झालेल्या खलाशांना अधिकृत तक्रार दाखल करावी लागेल.

- डी. जी. शिपिंग प्रत्येक खलाशाला ‘इंडोस’ नंबर आणि युजर आयडी-पासवर्ड देते. त्याआधारे लॉगिन करून डी. जी. शिपिंगच्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल उघडावी. त्यात तक्रार करण्यासाठी विशेष दालन असते. त्यामार्फत सात प्रकारच्या तक्रारी दाखल करता येतात.

- वेतनासंबंधातील तक्रारीचाही त्यात अंतर्भाव असतो. त्यावर तपशीलवार माहिती भरल्यानंतर आपली तक्रार डी. जी. शिपिंगकडे दाखल होते, अशी माहिती अभिजित सांगळे यांनी दिली.