Join us  

महापालिकेमध्ये २५ वर्षांमध्ये २१ आयुक्त

By admin | Published: March 28, 2017 6:29 AM

स्वत:च्या मालकीचे धरण व देशातील सर्वात भव्य मुख्यालय उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदाची खुर्चीही अस्थिर

नामदेव मोरे / नवी मुंबई स्वत:च्या मालकीचे धरण व देशातील सर्वात भव्य मुख्यालय उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदाची खुर्चीही अस्थिर बनली आहे. २५ वर्षांमध्ये २१ आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये फक्त विजय नाहटांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून तुकाराम मुंढे हे सर्वाधिक वादग्रस्त आयुक्त ठरले आहेत. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर सोमवारी एन. रामास्वामी यांच्याकडे पदभार सोपविला. २ मे २०१६ रोजी मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मालमत्ताकर व इतर विभागांमध्ये जावून तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. पण सोमवारी पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या रामास्वामी यांनी मात्र कोणताही अविर्भाव न दाखविता पालिकेत येवून आयुक्तपदाची सूत्रे घेतली व ८ मिनिटांमध्ये मुंढे यांच्या कारमधूनच ते मंत्रालयाकडे रवाना झाले. ३० तारखेला प्रत्यक्षात कामकाज सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या निमित्ताने पुन्हा एकदा पालिकेच्या स्थापनेपासूनच्या आयुक्तांच्या कामकाजाविषयी चर्चा सुरू झाली आहे. जानेवारी १९९२ मध्ये शासनाने आर. सी. सिन्हा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. यानंतर राजीव अग्रवाल, शंकर मेनन, आर. सी. सिन्हा, एम. रमेशकुमार यांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. १९९५ ला पहिली निवडणूक झाल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराचा विकास करण्यात आला. ग्रामपंचायतीमधून महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुुंबई ही देशातील एकमेव पालिका. उत्पन्नाची अपुरी साधने, आरोग्य, पाणी पुरवठ्यापासून अनेक समस्या असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी परिश्रम करून अडीच दशकांमध्ये देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक मिळवून दिला.पालिकेच्या वाटचालीमध्ये आयुक्त व नगरसेवक यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले, पण ते सर्व काही विशिष्ट विषयासाठीच होेते. कोणताच वाद जास्त दिवस कधीच टिकला नाही. पण मुंढे यांच्या कार्यकाळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद पूर्णपणे ठप्प झाला. आयुक्त मनमानी व हेकेखोरपणे वागत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे पाचच महिन्यांत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार - रामास्वामी पालिकेचे आयुक्त एन. रामास्वामी हे कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली काम करणारे नाहीत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यावर भर देणारा अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात त्यांनी केलेल्या कामाचे राज्यभर कौतुक झाले. मुंढेंच्या कार्यकाळात थांबला संवादआयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद पूर्णपणे थांबला. मुंढे यांचा प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेवर कधीच कोणी आडकाठी केलेली नाही. सुरवातीच्या काही दिवस त्यांच्या कामाचे कौतुकच झाले, पण त्यानंतर आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये झालेले मतभेद कधीच थांबले नाहीत व त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला व फक्त ११ महिन्यांमध्ये त्यांची बदली झाली. पालिकेच्या स्थापनेपासूनचे आयुक्त व त्यांचा कार्यकाळ आर. सी. सिन्हा (जानेवारी १९९२ ते आॅगस्ट ९२), राजीव अग्रवाल (३ ते ३१ आॅगस्ट १९९२), शंकर मेनन (सहा दिवस), आर. सी. सिन्हा (७ ते २७ सप्टेंबर १९९२), एम. रमेशकुमार (सप्टेंबर ९२ ते मे ९५), जी. बी. पिंगुळकर (७ दिवस), जी. एस. गिल (मे ते जुलै १९९५), जे. एम. फाटक (जुलै ९५ ते आॅक्टोबर ९६), एस. एल. कुलकर्णी (आॅक्टोबर ९६ ते मे ९८), सुभाषचंद्र भाकरे (मे ९८ ते मे २०००), पी. एस. मीना ( मे २००० ते जून २००१), मुकेश खुल्लर (जून २००१ ते जून २००२), सुनील सोनी (जून २००२ ते जून २००३), रमेश उबाळे (जून २००३ ते जून २००४), मधुकर कोकाटे (जून २००४ ते फेब्रुवारी २००७), विजय नाहटा (फेब्रुवारी २००७ ते सप्टेंबर २०१०), भास्कर वानखेडे (सप्टेंबर २०१० ते जून २०१३), ए. एल. जऱ्हाड (जून १३ ते जानेवारी २०१५), दिनेश वाघमारे (जानेवारी २०१५ ते मे २०१६), तुकाराम मुंढे (२ मे २०१६ ते २७ मार्च २०१७), एन. रामास्वामी (२७ मार्च २०१७ पासून पुढे)