Join us

नववी-दहावीसाठी २१ नव्या माध्यमिक शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - नवीन शैक्षणिक वर्षात महापालिकेने २१ नव्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - नवीन शैक्षणिक वर्षात महापालिकेने २१ नव्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका शाळांच्या इमारतींमध्येच उच्च प्राथमिक शाळांमधून नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे एकूण ११६२ विद्यार्थी संख्या वाढणार आहे. परिणामी, पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक, तर नववी ते दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण असते. पालिकेच्या केवळ ४९ माध्यमिक शाळा आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्यामुळे माध्यमिक शिक्षणासाठी खासगी शाळांचा खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी माध्यमिक शाळा वाढविण्याची मागणी नगरसेवक, पालक, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती.

त्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना नववी-दहावीचे शिक्षण घेता यावे, यासाठी २१ शाळांमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी माध्यम वगळता हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमाकरिता शिक्षक-शिक्षकेतर संवर्गातील भरती करावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

- २०२१-२२ शैक्षणिक वर्षात २१ नवीन शाळांमध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. यासाठी अनुदानित माध्यमिक शाळांकरिता निर्माण केलेल्या पदांमधूनच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत.

- राज्य सरकारकडून या शाळांसाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येणार नाही. पालिकेच्या माध्यमातून ही शाळा चालविण्यात येणार आहे. पालिका शाळांच्या धर्तीवर गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या अशा २७ प्रकारच्या वस्तू, पूरक आहार पालिकेकडून देण्यात येणार आहेत.

* यामध्ये मराठी माध्यमाच्या ४, इंग्रजी-८, हिंदी-६, उर्दू - १, तामिळ -१ आणि तेलुगू माध्यमाची एक शाळा सुरू करण्यात येणार आहे.

- २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात २१ नवीन शाळांमध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. यासाठी अनुदानित माध्यमिक शाळांकरिता निर्माण केलेल्या पदांमधूनच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत.