दहावीच्या २१ टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात रस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:09 AM2018-05-13T05:09:12+5:302018-05-13T05:09:12+5:30
दहावीनंतर २१ टक्के मुलांना वाणिज्य क्षेत्रात तर १२ टक्के मुलांना आरोग्य व विज्ञान क्षेत्रात जायचे आहे
मुंबई : दहावीनंतर २१ टक्के मुलांना वाणिज्य क्षेत्रात तर १२ टक्के मुलांना आरोग्य व विज्ञान क्षेत्रात जायचे आहे, असा निष्कर्ष समोर आला आहे. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली. त्याचा निष्कर्ष शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कल चाचणी घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे
कलचाचणीचा सविस्तर अहवाल ६६६.ेंँंूं१ीी१े्र३१ं.्रल्ल या पोर्टलवर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यांचा दहावी परिक्षेचा क्रमांक टाकल्यानंतर त्यांना कलचाचणी अहवाल मिळेल, असेही तावडे म्हणाले. वाणिज्य पाठोपाठ १८ टक्के मुलांना ललित कला आणि ११ टक्के मुलांना कला शाखेत आणि १५ टक्के मुलांना युनिफॉर्मड् सेवा निवडण्याची इच्छा या चाचणीतून समोर आली आहे. तांत्रिक शाखेत जाण्याचा कल १० टक्के मुलांनी दाखवला आहे.
तावडे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा शासनाचा दृष्टीकोन आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच देण्याचा शासनाचा मनोदय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कल चाचणी विद्यार्थ्यांचे ७ प्रमुख क्षेत्रातील कल परीक्षण करते. २०१७ च्या कल चाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच फाईन आर्टस् क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य मध्ये सर्वाधिक कल दिसून येत आहे.
शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने २०१६ पासून राज्य शासनाच्या १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात आली, असेही तावडे यांनी सांगितले.
करिअर निवडीस मदत
कलचाचणी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांचा संयुक्त प्रकल्प असून श्यामची आई फाऊंडेशन हे उरफ च्या सहाय्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करीत आहे. कल चाचणी प्रत्येक विद्यार्थ्याला करिअर निवड करण्यास मदत करते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकल्पाचा एक उत्कृष्ट उपयोजित प्रकल्प म्हणून कौतुक केले आहे आणि ४ राज्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.